दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याची आपल्या इमारतींच्या आवारातच विल्हेवाट लावणाऱ्या सोसायटय़ांना यापुढे मालमत्ता करात ७ टक्के सवलत मिळू शकणार आहे. मुंबई महापालिका प्रशासनाने तसा प्रस्ताव तयार केला आहे.

कचऱ्याचे वर्गीकरण करून ओल्या आणि सुक्या कचऱ्याची सोसायटीच्या स्तरावरच विल्हेवाट लावणाऱ्या सोसायटय़ांना ही सवलत मिळू शकणार आहे. गटनेत्यांच्या बैठकीत हा प्रस्ताव लवकरच मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. एका बाजूला पालिका प्रशासनाने कचऱ्यावर कर लावण्याचे ठरवले असताना ही सवलत देऊन नागरिकांना कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे.

तुम्ही जितका कचरा निर्माण कराल त्याच्या पटीत लोकांकडून कर वसूल करण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे. सोसायटी किंवा एखाद्या आस्थापनाकडून कचरा उचलून, वाहून नेण्यासाठी आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिका आता नागरिकांकडून कर वसूल करणार आहे. त्याचबरोबर ज्या सोसायटय़ा आपल्या कचऱ्याची स्वत:हूनच शास्त्रशुद्ध विल्हेवाट लावतील, त्यांना सवलत देण्याचेही पालिकेने ठरवले आहे. पालिकेने कचऱ्याशी निगडित ही नवी कररचना आणण्याचे ठरवले आहे.  याबाबतचा प्रस्ताव लवकरच गटनेत्यांपुढे मांडण्यात येणार आहे. त्यानंतर स्थायी समिती आणि सभागृहाच्या मान्यतेनंतरच रहिवासी, व्यापारी यांना प्रत्यक्षात हा कर किंवा सवलत लागू होऊ शकणार आहे. पालिकेच्या कचराभूमीची क्षमता संपत असल्यामुळे कचऱ्याचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रशासनाने अनेक उपाययोजना आणल्या. १०० किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणाऱ्या सोसायटय़ांना आपल्याच आवारात ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची सक्ती करण्यात आली होती. त्याचा पुढचा भाग म्हणून आता कचऱ्यावर कर लावण्यात येणार आहे, तसेच शून्य कचरा करणाऱ्या सोसायटय़ांना मालमत्ता करात सवलत मिळू शकणार आहे.

कर कोण आकारणार?

कचऱ्यावरील कराचे दर ठरवण्यात आले आहेत. त्यानुसार दर महिना १०० किलो कचरा निर्माण करणाऱ्या सोसायटय़ांना ६० रुपये भरावे लागणार आहेत. तर दुकाने आणि आस्थापनांसाठी हा दर ९० रुपये असणार आहे. साधारणत: प्रति माणशी अर्धा किलो कचरा रोज तयार होत असतो. मात्र या कचऱ्यावरील हा कर घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे वसूल केला जाणार की तो मालमत्ता करात अंतर्भूत केला जाणार याबाबत अद्याप सुस्पष्टता नाही.

सांडपाणी प्रक्रियेलाही प्रोत्साहन

सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या सोसायटय़ांना आणखी तीन टक्के सवलत  दिली जाणार आहे. सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया करून त्याचा वापर पिण्याव्यतिरिक्तच्या कामासाठी करणाऱ्या सोसायटय़ांना ही सवलत मिळू शकणार आहे.

सवलत कशी?

* कचऱ्याचे वर्गीकरण करून पालिकेला दिल्यास केवळ १ टक्का सवलत.

* कचऱ्याचे वर्गाकरण करून आपल्याच सोसायटीच्या आवारात खत प्रकल्प उभारून ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावल्यास ३ टक्केआणखी सवलत.

* सुका कचरा रद्दीवाल्याला विकणाऱ्या सोसायटय़ांना आणखी ३ टक्के सवलत.

* त्यामुळे शून्य कचरा धोरण राबवणाऱ्या सोसायटय़ांना एकूण ७ टक्के सवलत.

* मात्र यापैकी काहीही न करणाऱ्या सोसायटय़ांना दरमहा ६० रुपये कर, तर व्यापाऱ्यांना दरमहा ९० रुपये कर भरावा लागणार आहे.

Story img Loader