मुंबई : राज्यात राबविण्यात आलेल्या ‘१०० दिवस क्षयरुग्ण शोध मोहीम’अंतर्गत ४० हजार ४७१ क्षयरुग्ण सापडले. क्षयरोगासाठी अतिजोखीम असलेल्या निवडक १७ ग्रामीण जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात व १३ महानगरपालिका कार्यक्षेत्रात ही मोहीम राबविण्यात आली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२५ अखेर देशातून क्षयरोगाचे दुरिकरण करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवलेले आहे. त्याअनुषंगाने देशात राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत ७ डिसेबर २०२४ ते २४ मार्च २०२५ दरम्यान राज्यातील क्षयरोगासाठी अतिजोखीम असलेल्या निवडक १७ ग्रामीण जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात व १३ महानगरपालिका कार्यक्षेत्रात ‘१०० दिवस क्षयरुग्ण शोध मोहीम’ राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान राज्यात ४० हजार ४७१ क्षयरुग्ण शोधण्यात आले. यामध्येही जानेवारी व फेब्रुवारी २०२५ दरम्यान ७ लाख ५४ हजार ६११ व्यक्तींची संशयित क्षयरुग्ण म्हणून तपासणी करण्यात आली. यामध्ये ३९ हजार ७०५ क्षयरुग्ण सापडले.
क्षयरोगाचे रुग्ण शोधण्यासाठी आरोग्य यंत्रणेमार्फत नियमित सर्वेक्षण तसेच सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम व १०० दिवस मोहिमेसारख्या विशेष मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. यामध्ये संशयित क्षयरुग्ण शोधून त्यांच्या छातीचा क्ष किरण काढून व त्यांच्या बेडका नमुन्याची मशीन व सुक्ष्मदर्शकाद्वारे मोफत तपासणी केली जाते. राज्य सरकारकडून ८० हाताळण्यायोग्य डिजीटल क्ष किरण यंत्र खरेदी करून जिल्ह्यांना वितरीत केल्या आहेत. तसेच, बेडका नमूना तपासणीसाठी राज्यात १७१ सीबीनॅट व ६२४ ट्रूनॅट यंत्र राज्यातील विविध जिल्हा व महानगरपालिका कार्यक्षेत्रात उपलब्ध करण्यात आल्या आहेत. २०२५ निश्चित सुक्ष्मदर्शक केंद्रे कार्यान्वीत आहेत.
मुंबईत वर्षभरात साठ हजार रुग्ण
मुंबईमध्ये वर्ष २०२४ मध्ये ६० हजार ६३३ क्षयरोगाचे रुग्ण आढळले. त्यापैकी ५३ हजार ६३८ क्षयरोगाचे रुग्ण मुंबईतील रहिवासी आहेत. क्षयरोगाच्या एकूण रुग्णांपैकी ३८ टक्के हे फुफ्फुसाव्यतिरिक्त क्षयरोगाचे रुग्ण आणि ६ टक्के बालरुग्ण होते. तसेच ९ टक्के हे औषध-प्रतिरोधक रुग्ण होते.
तीन वर्षात सात लाख क्षयरुग्ण
राज्यात २०२२ मध्ये १९ लाख ९८ हजार ३५६ व्यक्तींची संशयित क्षयरुग्ण म्हणून तपासणी करण्यात आली. त्यामध्ये २ लाख ३३ हजार ८७२ क्षयरुग्ण सापडले. त्याचप्रमाणे २०२३ मध्ये तपासणी केलेल्या २६ लाख २२ हजार ६४६ व्यक्तींमध्ये २ लाख २३ हजार ४४४ क्षयरुग्ण सापडले. २०२४ मध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाने ३५ लक्ष ३९ हजार ९४१ व्यक्तींची संशयित क्षयरुग्ण म्हणून तपासणी केली. त्यामध्ये २ लाख ३० हजार ५१५ क्षयरुग्ण आढळून आले. २०२५ मध्ये केंद्रीय क्षयरोग विभागाकडून राज्याला २ लाख ३० हजार क्षयरुग्ण शोधण्याचे उद्दिष्ट दिले आहे.