एका १६ वर्षीय तरुणीवर सात जणांनी गेल्या काही महिन्यांपासून बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. बोरिवली पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ आरोपींनी बलात्कार केल्यामुळे या घटनेला सामूहिक बलात्कार म्हणता येणार नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले.
दहिसर येथे राहणारी ही १६ वर्षीय तरुणी बोरिवलीत घरकाम करत होती. तिथे तिची एका तरुणाशी ओळख झाली. त्याने तिच्याशी मैत्री करून शरीरसंबंध ठेवले. त्यानंतर या तरुणाच्या दोन मित्रांनी तिला या प्रकाराची वाच्यता करू असे सांगत तिच्यावर बलात्कार केला. त्यांच्या अन्य साथीदारांनीही तिच्यावर अशाच पद्धतीने बलात्कार केला. जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत तिच्यावर विविध ठिकाणी या सात आरोपींकडून बलात्कार केल्याचे तिने सांगितले.
यातून ही मुलगी गर्भवती राहिली आणि तिने ३० नोव्हेंबर रोजी अंधेरी येथे एका रुग्णालयात मुलाला जन्म दिला. या प्रकारानंतर पिडीतेच्या कुटुंबियांनी अंधेरी पोलीस ठाण्यात तक्रार केली. अंधेरी पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंद करून प्रकरण बोरिवली पोलिसांकडे वर्ग केले.
बोरिवली पोलिसांनी याप्रकरणी तपास करून राहुल सोनावणे (२०) आणि तुषार निंबाळकर (२४) या दोन आरोपींना अटक केली. या पिडीत मुलीने नावे सांगितलेल्या अन्य पाच जणांचा शोध सुरू आहे. या पिडीत तरुणीवर बोरिवली पोलिसांच्या हद्दीत दोन तरुणांनी बलात्कार केला होता. त्यांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. तिच्यावर जानेवारीपासून वेगवेगळ्या ठिकाणी सात जणांनी बलात्कार केला. त्यामुळे त्याला सामूहिक बलात्कार म्हणता येणार नाही, असे पोलीस उपायुक्त डॉ महेश पाटील यांनी सांगितले.
अल्पवयीन तरुणीवर सात जणांचा बलात्कार
एका १६ वर्षीय तरुणीवर सात जणांनी गेल्या काही महिन्यांपासून बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. बोरिवली पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे.
First published on: 11-12-2013 at 01:42 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 7 men gang raped teen from 10 months in borivali