अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर, राजगुरुनगर, वरणगाव, भोकर, वाडी व मोवाड या ७ नगरपरिषदांच्या सार्वत्रिक, पांढरकवडा नगरपरिषदेच्या हद्दवाढ क्षेत्रातल्या २, तर इतर नगरपरिषदांमधील १० रिक्त पदांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार २२ एप्रिल रोजी मतदान होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी बुधवारी दिली.
सहारिया म्हणाले, मैंदर्गी, वडगाव, गेवराई, उद्गीर, मोर्शी, कामठी व तिरोडा नगरपरिषदेच्या प्रत्येकी एका जागेसाठी; तर औसा नगरपरिषदेच्या तीन जागांसाठी पोटनिवडणूक होईल. सार्वत्रिक निवडणूक असलेल्या सर्व ७ नगरपरिषदा आणि पोटनिवडणूक होत असलेल्या संबंधित प्रभागात आज मध्यरात्री १२ पासून आचारसंहिता लागू होईल. निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहील.
सार्वजनिक सुट्टयांचा दिवस वगळून २५ ते ३१ मार्च या कालावधीत नामनिर्देशनपत्रे दिले व स्वीकारले जातील. १ एप्रिल रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल व त्याचदिवशी नामनिर्देशनपत्रे वैध ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. न्यायालयीन अपील नसलेल्या ठिकाणी ८ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. अपील असल्यास त्यावरील निर्णयाच्या तारखेनंतर तिसऱ्या दिवसापर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याच्या शेवटच्या मुदतीनंतर दुसऱ्या दिवशी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल व निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल. १७ एप्रिल रोजी मतदान केंद्रांची आणि मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. २२ एप्रिल रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या कालावधीत मतदान होईल. २३ एप्रिलला सकाळी दहापासून मतमोजणीला सुरुवात होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा