लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : ठाणे आणि नवी मुंबई मेट्रोने जोडण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ‘कल्याण – डोंबिवली – तळोजा मेट्रो १२’ मार्गिकेच्या उभारणीचे काम हाती घेतले आहे. या मार्गिकेच्या कामाला मार्च २०२४ मध्ये सुरुवात झाली असून ११ महिन्यांच्या कालावधीत ‘मेट्रो १२’ मार्गिकेचे ७ टक्के काम पूर्ण झाले आहे. या मार्गिकेचे काम डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. त्यानुसार आता कामाला वेग देण्यात आला असून लवकरच या मार्गिकेतील निळजे कारशेडच्या कामालाही सुरुवात करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. यासाठी येत्या काही दिवसातच कारशेडच्या कामासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

एमएमआरडीएच्या ३३७ किमी लांबीच्या मेट्रो प्रकल्पातील ‘कल्याण – तळोजा मेट्रो १२’ मार्गिका एक महत्त्वाची मार्गिका आहे. ही मार्गिका ठाणे आणि नवी मुंबई अशा दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणार आहे. ‘ठाणे – भिवंडी – कल्याण मेट्रो ५’ मार्गिकेचा विस्तार ‘मेट्रो १२’ मार्गिकेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. २०.७५ किमी लांबीची आणि १९ मेट्रो स्थानकांचा समावेश असलेली ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल झाल्यास कल्याण – डोंबिवली – नवी मुंबई अंतर अवघ्या काही मिनिटांत पार करण्यात येणार आहे. ‘मेट्रो १२’ मार्गिकेच्या कामाला मार्च २०२४ मध्ये सुरुवात करण्यात आली असून गेल्या ११ महिन्यांच्या कालावधीत या मार्गिकेचे केवळ ७ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती एमएमआरडीएतील सूत्रांनी दिली. आता एमएमआरडीएने ‘मेट्रो १२’च्या कामाला गती दिली आहे. त्यामुळे या मार्गिकेचे काम डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण होईल, असा विश्वासही सूत्रांनी व्यक्त केला.

मेट्रो १२ मार्गिकेचे काम डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण करून ती वाहतूक सेवेत दाखल केली जाणार आहे. त्यामुळे ठाणे – कल्याण – डोंबिवली – नवी मुंबई असा मेट्रो प्रवास करण्यासाठी ठाणेकर आणि नवी मुंबईकरांना जानेवारी – फेब्रुवारी २०२८ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान, ‘मेट्रो १२’ मार्गिकेच्या कामाला वेग देतानाच दुसरीकडे या मार्गिकेच्या निळजे कारशेडच्या कामालाही लवकरात लवकर सुरुवात करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

‘मेट्रो १२’साठी निळजे-निळजेपाडा येथील ४५ हेक्टर जागेवर कारशेड बांधण्यात येणार आहे. या जागेचा ताबा एमएमआरडीएने घेतला आहे. आता प्रत्यक्ष कारशेडच्या कामाला सुरुवात करण्याच्यादृष्टीने निविदा प्रक्रिया राबविण्याचे काम सुरू आहे. येत्या काही दिवसांतच कारशेडच्या कामासाठी निविदा मागविण्यात येतील आणि त्यानंतर कारशेडच्या कामाला सुरुवात होईल, असेही सूत्रांनी सांगितले.