लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: ‘डी. एन. नगर, अंधेरी पश्चिम – मंडाले मेट्रो २ ब’ मार्गिकेतील मंडाले कारशेडच्या कामाने वेग घेतला आहे. आतापर्यंत कारशेडचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामे शक्य तितक्या लवकर पूर्ण करून २०२४ मध्ये ‘मेट्रो २ ब’ मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करण्याचा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (एमएमआरडीए) मानस आहे.

एमएमआरडीएने हाती घेतलेल्या ३३७ किमी लांबीच्या मेट्रो प्रकल्पातील ‘मेट्रो २ ब’ मार्गिका एक महात्त्वाची मार्गिका आहे. ही मार्गिका २३.६४ किमी लांबीची असून या मार्गिकेमुळे पश्चिम उपनगरातून पूर्व उपनगरात जाणे सोपे होणार आहे. या मार्गिकेसाठी मंडाले येथील ३१ एकर जागेवर कारशेड बांधण्यात येत आहे. या कारशेडमध्ये एका वेळी ७२ मेट्रो गाड्या उभ्या करता येणार आहेत. दरम्यान, या मार्गिकेचे काम २०२४ मध्ये पूर्ण करून ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे एमएमआरडीएने मार्गिकेसह कारशेडच्या कामाला वेग दिला आहे.

सविस्तर वाचा… मुंबई: एसटीच्या चालक-वाहकांसाठी वातानुकूलित विश्रांतीगृह बांधणार

आतापर्यंत कारशेडचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. यातील ‘स्टेबलिंग कास्टिंग यार्ड टप्पा १’चे ९६ टक्के, तर ‘स्टेबलिंग कास्टिंग यार्ड टप्पा २’चे ३६ टक्के काम पूर्ण झाले आहे. गाड्यांच्या चाचणीसाठी रुळांचे ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. एकूणच कारशेडचे काम वेगात सुरू असून २०२४ मध्ये कारशेडसह ‘मेट्रो २ ब’ मार्गिकेचे काम पूर्ण होईल, असा दावा करण्यात येत आहे.

Story img Loader