बोरीवली (पश्चिम) चंदावरकर रोड येथील अपेक्स हॉस्पिटलमध्ये नुकतीच एक आश्चर्यकारक घटना घडली आहे. ठाणे येथे राहणाऱ्या ७० वर्षांच्या महिला मागील ३ महिन्यापासून पोटदुखीमुळे आजारी होत्या. या पोटदुखीमुळे त्यांना भूकही लागत नव्हती. या तीन महिन्यात त्यांचे वजन १० ते १२ किलोने कमी झाले होते. या महिलेची समस्या डॉक्टरांना न समजल्याने तिला केवळ पेनकिलर गोळ्या दिल्या जात होत्या. याविषयी अधिक माहिती देताना अपेक्स सुपर स्पेशालिटीच्या लॅप्रोस्कॉपीक शल्यविशारद डॉ. आदिती अग्रवाल म्हणाल्या,”या महिलेच्या वैद्यकीय तपासण्या केल्यावर त्यांच्या पोटात ट्यूमर आहे असे वाटले. पण आणखी तपासणी केली तेव्हा शेवाळ्यासारखा गोळा असल्याचे कळले. या गोळ्याला वैद्यकीय भाषेत फायटोबिझोअर म्हणतात.
वैद्यकीय क्षेत्रातील या दुर्मिळ प्रकारात फळांच्या साली तसेच न पचलेल्या भाज्या साचल्यामुळे असे गोळे तयार होतात. या गोळ्यामुळे पोटाला ईजा होऊन कधीकधी पोटामध्ये रक्तस्राव होऊ शकतो. फायबरचे अपुरे सेवन, पाण्याचे अपुरे सेवन, शारीरिक हालचालींचा अभाव, बैठी जीवनशैली किंवा आजारपणामुळे बिछान्याला खिळून राहणे, नैराश्य व उच्च रक्तदाबावर उपचार करण्यासाठी घेतलली औषधे, लॅक्सेटिव्ह आणि एनिमा यांचा गैरवापर अशा अनेक कारणामुळे न पचलेल्या अन्नाचा गोळा बनू शकतो. हा गोळा आपल्या पोटातील जठरामध्ये अडकून राहिल्यामुळे भूक लागत नाही व पोटामध्ये अन्न न गेल्यामुळे वजन कमी होते. या केसमध्ये पोटाला छोटेसे छिद्र पाडून लॅप्रोस्कॉपिक शल्यचिकित्सने हा गोळा काढण्यात आम्हाला यश आले. या गोळ्याचे वजन ५५० ग्रॅम वजन होते.
वैद्यकीय इतिहासामध्ये अशा घटना फारच दुर्मिळ मानल्या जातात. जगभरातील वैद्यकीय इतिहासात आतापर्यंत अशाप्रकारच्या १२० पेक्षाही कमी केसेसची नोंद झाल्याची माहिती आहे. २०१७ मध्ये घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात एका महिलेच्या पोटातून ७५० ग्रॅम वजनाचा केसाचा पुंजका बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले होते. अपेक्स हॉस्पिटल समूहामध्ये असलेल्या आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे अशा दुर्मिळ शल्यचिकीत्सा यशस्वीरीत्या होतात व रुग्ण २४ तासांत पूर्ववत होऊन घरी जातो अशी माहिती अपेक्स हॉस्पिटल समूहाचे संचालक डॉ व्रजेश शहा यांनी दिली.