दक्षिण मुंबईतील तारदेव पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. येथील एका ७० वर्षीय वृद्ध महिलेचा दुर्दैवी अंत झाला आहे. रविवारी सकाळी सहाच्या सुमारास मृत महिला आपल्या ७५ वर्षीय पतीसह मॉर्निंग वॉकसाठी घरातून बाहेर पडत होती. यावेळी तीन दरोडेखोरांनी त्यांच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केला. घरातील मौल्यवान वस्तूंची चोरी करताना दरोडेखोरांनी पीडित महिलेचे आणि तिच्या पतीचे हात-पाय बांधले. तसेच तोंडावर पट्टी लावली.
या दुर्दैवी घटनेत ७० वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर पतीला दुखापत झाली. युसूफ मंझील इमारतीत ही धक्कादायक घटना घडली. सुरेखा अग्रवाल असं ७० वर्षीय मृत महिलेचं नाव आहे. तर त्यांच्या ७५ वर्षीय पतीचं नाव मदन मोहन अग्रवाल आहे. दोघंही याच फ्लॅटमध्ये वास्तव्याला होते.
तारदेव पोलीस ठाण्याच्या एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी रविवारी सकाळी सहाच्या सुमारास हे जोडपं त्यांच्या फ्लॅटमधून मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडत होतं. याचवेळी तीन दरोडेखोर घरात शिरले. त्यांनी पीडित जोडप्याच्या तोंडावर पट्टी लावली आणि त्यांचे हात-पाय बांधले. त्यानंतर दरोडेखोरांनी घरातील सोन्याचे दागिने, घड्याळे आणि रोख रक्कम घेऊन पोबारा केला.
‘एनडीटीव्ही’ने दिलेल्या वृत्तानुसार, तिन्ही दरोडेखोर घटनास्थळावरून पळून गेल्यानंतर महिलेचे पती कसेबसे फ्लॅटच्या दारापर्यंत आले आणि त्यांनी अलार्म बटण दाबले. यानंतर संबंधित हाऊसिंग सोसायटीतील नागरिक त्यांच्या मदतीला धावून आले. मात्र, पीडित महिला बेशुद्धावस्थेत आढळली. यानंतर नागरिकांनी पीडित महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी वृद्ध महिलेला मृत घोषित करण्यात केलं. याप्रकरणी तीन अज्ञात दरोडेखोरांविरोधात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.