आरोपींना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे हे पोलिसांचे काम, पण पोलिसांवरच गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे वास्तव समोर आले आहे. २०१२ या वर्षांत राज्यातील सुमारे सात हजार पोलिसांविरोधात तक्रारी आल्या आहेत. अर्थात त्यापैकी ६६ टक्के तक्रारी ‘बोगस’ असल्याचे दाखवून पोलिसांनी त्या निकाली काढल्या आहेत; परंतु सव्वा दोन हजार तक्रारी वैध निघाल्या आहेत. मात्र त्यांच्यावरही कारवाई करण्याची तत्परता दिसून येत नाही.
कायदा सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारांना पकडणे हे पोलिसांचे काम. त्यासाठी पोलिसांना विशेष अधिकारही देण्यात आले आहेत, परंतु पोलीस या अधिकाराचा गैरवापर करत असल्याचे अनेक प्रकरणांवरून समोर आले आहे. २०१२ या वर्षांत संपूर्ण देशात पोलिसांविरोधात एकूण ४४,४५९ तक्रारी आल्या होत्या, तर महाराष्ट्रात ६,९२५ तक्रारी आल्या होत्या. अर्थात वरिष्ठांनी या तक्रारींची छाननी करून त्यापैकी ४,५४९ तक्रारी या बिनबुडाच्या आणि खोटय़ा असल्याचा निष्कर्ष काढत निकाली काढल्या आहेत. तरीसुद्धा २,३७६ तक्रारी वैध ठरल्या असून त्या दाखल करून घेण्यात आल्या आहेत.
या वैध तक्रारींपैकी ३८० प्रकरणांत पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून १७३ पोलिसांविरोधात खटले सुरू केले आहेत. ९९ पोलिसांविरोधात खात्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. दाखल झालेल्या १७३ प्रकरणांपैकी फक्त २५ प्रकरणांची सुनावणी पूर्ण झाली आहे. त्यापैकी २० पोलिसांना निर्दोष सोडून अवघ्या पाच जणांना दोषी ठरविण्यात आले
आहे. पोलिसांनी कारवाई केली तर लोकांना ती अन्यायकारक वाटते म्हणून ते तक्रारी करतात, असा दावा पोलीस करतात. त्यातील खोटय़ा ठरवून फेटाळलेल्या तक्रारी गृहीत धरल्या तरी सुमारी सव्वा दोन हजार तक्रारी पोलिसांच्या बळजबरी आणि अधिकाराचा गैरवापर दर्शवत
आहेत.
पोलिसांविरोधातील तक्रारी- ६९२५
खोटय़ा तक्रारी- ४५४९
वैध तक्रारी- २३७६
गुन्हे दाखल- १७३
खटले पूर्ण- २५
दोषी- ०५
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा