मानव विकास निर्देशांकानुसार ‘महाराष्ट्रातील सर्वात मागास तालुका’ अशी ओळख असणाऱ्या ठाणे जिल्ह्य़ातील मुरबाडमध्ये गेले तीन दिवस राबविण्यात आलेल्या शासकीय योजनांच्या अनोख्या जत्रेत स्थानिक रहिवाशांनी लाखोंच्या संख्येने सहभागी होऊन उदंड प्रतिसाद दिला.  
केंद्र, राज्य तसेच विविध महामंडळांमार्फत राबविण्यात येणाऱ्या तब्बल ११८ योजना ५५ स्टॉल्सच्या माध्यमातून या जत्रेत उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. आवश्यक त्या कागदपत्रांचा अभाव, चुकीचे अर्ज भरणे आदी कारणांमुळे अनेकांना या तीन दिवसांत पात्र असूनही योजनांचा लाभ घेता आला नाही. तरीही एकूण ७० हजार नागरिकांनी कोणती तरी एक शासकीय योजना पदरात पाडून घेतली. हा अभिनव प्रयोग यशस्वी करणाऱ्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचा स्थानिक आमदार आणि जत्रेचे संयोजक किसन कथोरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
आधार कार्ड, पॅन कार्ड, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, वाहन परवाना, माती परीक्षण, रेशन कार्ड अशा अनेक योजनांच्या स्टॉल्ससमोर तिन्ही दिवशी नागरिकांच्या रांगा दिसून येत होत्या. आवश्यक त्या कागदपत्रांच्या फोटोप्रती काढण्यासाठी जत्रेत झेरॉक्सही सुविधाही देण्यात आली होती. तसेच गावाकडच्या मंडळींना अर्ज लिहून देण्यासाठी ४० शालेय विद्यार्थी जत्रेत होते.  अडीच हजार शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीतील मातीचे परीक्षण करून दिले. मानव विकास योजनेतून ७५० शालेय विद्यार्थिनींना सायकली देण्यात आल्या. तालुक्यातील १० हजार शेतकऱ्यांचा आम आदमी विमा काढण्यात आला आहे. त्यांच्या आठ हजार मुलांची बँकेत बचत खाती काढण्यात आली. त्यांना शिक्षणासाठी प्रत्येकी १२०० रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे.