मध्य रेल्वेवर लांब पल्ल्याच्या गाडय़ांसाठी परळ येथे टर्मिनस उभारले जाणार असून त्यासाठी १३९ वर्षे जुन्या परळ वर्कशॉपच्या जागेवर टर्मिनस उभारण्याचा घाट घातला जात आहे. त्यासाठी रेल्वे कर्मचारी संघटनांचा विरोध होत असला तरीही त्याला न जुमानता सोमवारी मध्य रेल्वेने परळ वर्कशॉपमधील विविध पदांवरील ७१५ कर्मचाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले. त्यांची बदली थेट अमरावतीतील रेल्वेच्या बडनेरा येथील वर्कशॉपमधे करण्यात आली आहे.

सध्या मध्य रेल्वेवर सीएसएमटी, दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथून लांब पल्ल्याच्या गाडय़ा सुटतात. या तीनही टर्मिनसवरील भार कमी करण्यासाठी परळ वर्कशॉपच्या जागेवर आणखी एक टर्मिनस उभारण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या प्रकल्पाचा जवळपास २२० कोटी रुपये खर्च आहे.

प्रकल्पामुळे वर्कशॉप बंद करून येथील ४००० कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने महाराष्ट्रात अन्यत्र बदली केली जाणार आहे.

सोमवारी ७१५ कर्मचाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले. यामध्ये कनिष्ठ अभियंता, तांत्रिक कर्मचारी,  वरिष्ठ व कनिष्ठ लिपिक, मदतनीस इत्यादी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

ही बदली सध्या एक वर्षांची असेल अशी माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली. बदली अमरावतीच्या बडनेरातील वॅगन दुरुस्ती वर्कशॉपमध्ये केली आहे. दरम्यान, परळ वर्कशॉप बंद करण्याला नॅशनल रेल्वे मजदूर युनियनसह अन्य संघटनांनीही विरोध दर्शविला आहे. या बदली आदेशामुळे कर्मचाऱ्यांकडून तीव्र आंदोलन होण्याची शक्यता आहे.

परळ टर्मिनससाठी रेल्वेचा प्रयत्न

परळ टर्मिनस प्रस्तावानुसार, लांब पल्ल्याच्या रेल्वेसाठी पाच फलाट उभारण्यात येणार आहेत, तर त्याच्या जवळच रेल्वे उभ्या करण्यासाठी पाच ‘स्टेबलिंग लाइन’ उभारण्यात येतील. रेल्वेची व्यवस्थित पाहणी करून त्यात काही तांत्रिक दुरुस्ती करता यावी यासाठी पाच ‘पिट लाइन’ही बांधल्या जाणार आहेत. पाच वर्षांत टर्मिनस बनवण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी २२० कोटी रुपये खर्च येईल.