हार्बर मार्गावर बारा डब्यांच्या लोकल गाडय़ा चालवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ७२ तासांचा विशेष ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रशासनाने १९, २० आणि २१ फेब्रुवारी या कालावधीत हा ब्लॉक घेण्याचे जाहीर केले आहे. ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील यार्डाचे काम हाती घेण्यात येणार आहे.
हा ब्लॉक आधीच घेण्यात येणार होता, मात्र ‘मेक इन इंडिया’मुळे तो पुढे ढकलण्यात आला होता. आता हा ब्लॉक हार्बर मार्गावर १९ फेब्रुवारीला मध्यरात्री दीड वाजता सुरू होईल. त्यानंतर २२ फेब्रुवारीच्या मध्यरात्री दीड वाजता हा ब्लॉक संपेल. ब्लॉकच्या काळात छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील फलाट क्रमांक एक हा २० आणि २१ फेब्रुवारी रोजी बंद राहील, तर फलाट क्रमांक दोन १९ ते २१ फेब्रुवारीपर्यंत बंद राहील. हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी टर्मिनस ते वडाळादरम्यानची वाहतूक २० आणि २१ फेब्रुवारीला बंद राहणार आहे. २१ फेब्रुवारीला मुख्य मार्ग आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील वाहतूक वेळापत्रकाप्रमाणे धावणार असल्याचे मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक अमिताभ ओझा यांनी सांगितले.

Story img Loader