मुंबईः लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या फिरत्या तपासणी पथकाने ७२ लाखांची संशयीत रक्कम घाटकोपर पूर्व परिसरात पकडली. प्राथमिक तपासणीत ती एका बांधकाम व्यवसायाशी संबंधित रक्कम असल्याचे निष्पन्न झाले असून ती रक्कम प्राप्तीकर विभागाच्या ताब्यात देण्यात आली आहे. प्राप्तीकर विभाग या रकमेची सत्यता पडताळून पाहत आहेत.
घाटकोपर पूर्व येथील निलयोग मॉल येथे निवडणूक आयोगाच्या फिरत्या तपासणी पथकाने मोटारगाडीची तपासणी केली. त्यावेळी वाहनामध्ये रोख ७२ लाख ३९ हजार ६७५ रुपये सापडले. या गाडीत दिलीप नाथानी व अतुल नाथानी हे दोघे होते. आपण प्राप्तीकराशी संबंधित काम करणारी असून सनदी लेखापाल असल्याचे त्यांनी सांगितेल. तसेच वाशीतील एका बांधकाम व्यवसायिकाशी संबंधित ही रक्कम असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा – साताऱ्यात उदयनराजे यांना महायुतीतूनच विरोध
हेही वाचा – प्रीपेड की पोस्टपेड वीज मीटर हवा ? ग्राहकांना निवड करू देण्याची जनहित याचिकेद्वारे मागणी
याबाबतची माहिती उपजिल्हाधीकारी रवींद्र ठाकरे, तहसिलदार वृशाली पाटील व प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. मोटरगाडीतील दोघांचीही चौकशी करण्यात आली. त्यांना अधिक चौकशीसाठी पंतनगर पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते. प्राथमिक तपासणीत ही रक्कम निवडणुकीशी संबंधित नसल्याचे दिसून आहे. मात्र या रोख रकमेबाबत तपासणी सुरू असून ही रक्कम प्राप्तिकर विभागाच्या ताब्यात देण्यात आली आहे. प्राप्तिकर विभाग याबाबत अधिक तपास करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.