मुंबई : मुंबई मंडळाने गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थनगर अर्थात पत्राचाळ पुनर्विकासाअतंर्गत उभारण्यात आलेल्या पुनर्वसित इमारतींच्या तळमजल्यावर दुकाने बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मंडळाने ७२ दुकानांच्या बांधकामाला नुकतीच सुरुवात केली. येत्या सहा महिन्यांत या दुकानांचे बांधकाम पूर्ण करण्याचे मुबंई मंडळाचे नियोजन आहे. तर बांधकाम पूर्ण होऊन भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर या दुकानांची ई – लिलावाच्या माध्यमातून विक्री करून महसूल मिळविण्याचा मुंबई मंडळाचा प्रयत्न आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पत्राचाळ वसाहतीचा पुनर्विकास २००८ पासून रखडला होता. हा पुनर्विकास प्रकल्प वादग्रस्त ठरला होता. पण आता मात्र हा प्रकल्प म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून मार्गी लावण्यात येत आहे. विकासकाने अर्धवट सोडलेला प्रकल्प मुंबई मंडळ पूर्ण करीत आहे. या प्रकल्पातील मूळ भाडेकरूंच्या ६७२ घरांचा समावेश असलेल्या पुनर्वसित आठ इमारतींचे काम पूर्ण झाले आहे. काम पूर्ण झाल्याने अंशत: निवासी दाखला मिळविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

हेही वाचा >>> House Wall Collapse In Bhandup : भांडुपमध्ये घराची भिंत कोसळून तिघे जखमी

दुसरीकडे या पुनर्वसित इमारतींमध्ये दुकाने बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुनर्विकास प्रकल्पाच्या मूळ आराखड्यात, पुनर्वसित इमारतीत दुकाने समाविष्ट असल्याचे स्पष्ट करीत मंडळाने दुकानांच्या बांधकामाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबई मंडळाने नुकतीच दुकानांच्या बांधकामाला सुरुवात केली आहे.

सहा महिन्यांत पूर्तता

पुनर्वसित इमारतींच्या तळमजल्यावर ७२ दुकानांच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रफळाची ही दुकाने असून या दुकानांचे काम येत्या सहा महिन्यांत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिली. दुकानांचे काम येत्या सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचेही बोरीकर यांनी सांगितले. दरम्यान दुकानांचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील कार्यवाही पूर्ण करून त्यांची ई – लिलावाद्वारे विक्री केली जाणार आहे. या ई – लिलावातून मंडळाला अंदाजे ६० ते ७० कोटी रुपये महसूल मिळण्याची शक्यता आहे. पत्राचाळीसारख्या मोक्याच्या ठिकाणी म्हाडा दुकाने उपलब्ध करणार असल्याने ही बाब इच्छुकांसाठी दिलासा ठरेल.

हेही वाचा >>> आमचे पैसे परत द्या! वातानुकूलित उपनगरी रेल्वेगाड्यांतील पासधारक प्रवाशांची मागणी

दुकानांना मूळ रहिवाशांचा विरोध

मुंबई मंडळाने पत्राचाळ पुनर्विकासाअंतर्गत उभारलेल्या पुनर्वसित इमारतीतील ७२ दुकानांना पत्राचाळीतील रहिवाशांचा विरोध आहे. पुनर्वसित इमारतीच्या मूळ आराखड्यात कुठेही दुकानांची तरतूद नाही, असा आक्षेप नोंदवत रहिवाशांनी मुंबई मंडळाच्या दुकानांच्या बांधकामाच्या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. रहिवाशांचे लक्ष न्यायालयाच्या निकालाकडे लागलेले आहे. दरम्यान, दुकानांचे बांधकाम मुंबई मंडळाने थांबवावे, दुकाने बांधण्याचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात आली आहे. या मागणीसाठी रहिवासी आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 72 shops of mhada in patra chawl to be sold through e auction mumbai print news zws