जोगेश्वरी पूर्व येथे वृद्ध दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या नोकराला मेघवाडी पोलिसांनी अवघ्या चार तासात अटक केली. आरोपीच्या हल्ल्यात ७२ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. सुधीर कृष्णकुमार चिपळुणकर (७२) व सुप्रिया सुधीर चिपळूणकर दाम्पत्य जोगश्वरी पूर्व येथील मजास वाडीतील समर्थ हाऊसिंग सोसायटीमध्ये राहत होते.
हेही वाचा >>> मुंबई : दारूच्या नशेत वारंवार बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्या सराईत आरोपीला अटक
त्यांचा नोकर पप्पूने बुधवारी सायंकाळी ७ च्या सुमारास त्यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला. त्यात सुधीर यांचा मृत्यू झाला, तर सुप्रिया गंभीर जखमी झाल्या. याप्रकरणी सोमवारी मेघवाडी पोलिसांनी हत्या व हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर अवघ्या चार तासांत आरोपी पप्पूला अटक केली. आरोपी अंधेरी पश्चिम येथील डोंगर परिसरात राहतो. हत्येसाठी वापरण्यात आलेला चाकू अद्याप हस्तगत करण्यात आलेला नसून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.