लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुंबई: मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या सागरी किनारा मार्ग प्रकल्पातील प्रिन्सेस स्ट्रीट – वांद्रे वरळी सागरी सेतूच्या दक्षिण टोकादरम्यानच्या मार्गाचे बांधकाम वेगात सुरू असून आतापर्यंत मार्गाचे ७४ टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाचे काम नोव्हेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचा मानस होता. मात्र वरळी येथील पुलाच्या खांबांमधील अंतर वाढविल्यामुळे बांधकाम कालावधीत वाढ झाली असून हा पूल वाहतुकीसाठी खुला होण्यासाठी जून २०२४ पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या ‘मुंबई सागरी किनारा मार्ग’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम वेगात सुरू असून आतापर्यंत प्रकल्पाचे ७४ टक्के काम पूर्ण झाले आहे. प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपुलापासून वांद्रे वरळी सागरी सेतूच्या दक्षिण टोकापर्यंतच्या सागरी किनारा मार्गाचे बांधकाम मुंबई महानगरपालिका करीत आहे. या मार्गाची लांबी १०.५८ किलोमीटर इतकी आहे. या प्रकल्पाच्या बांधकामाला ऑक्टोबर २०१८ मध्ये सुरुवात झाली. मात्र न्यायालयाची स्थगिती, करोनामुळे लागू झालेली टाळेबंदी आदी विविध कारणांमुळे या प्रकल्पाची अंतिम मुदत वारंवार वाढविण्यात आली. आता वरळी येथील पुलाच्या खांबांमधील अंतर वाढविण्यात आल्यामुळे प्रकल्पपूर्तीच्या कालावधीत वाढ झाली असून हा पूल वाहतुकीसाठी खुला होण्यासाठी जून २०२४ उजडण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
आणखी वाचा- ‘मेट्रो ३’वरील आरे- बीकेसी मार्गिका डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार
सागरी किनारा प्रकल्पांतर्गत ३४ मीटर रुंद आणि सुमारे २,१०० मीटर लांबीचा पूल बांधण्यात येणार आहे. त्यासाठी वरळीच्या समुद्रात खांब उभारावे लागणार आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये या पुलासाठी उभारण्यात येणाऱ्या दोन खांबांमधील अंतर कळीचा मुद्दा बनला होता. सागरी किनारा मार्ग प्रकल्पांतर्गत वरळीच्या क्लिव्ह लॅण्ड बंदराजवळ उभारण्यात येणाऱ्या दोन खांबांमधील अंतर १६० मीटर असावे अशी मागणी मच्छीमार संघटनाकडून करण्यात आली होती. तर दोन खांबांमध्ये ६० मीटर अंतर पुरेसे असल्याचा दावा मुंबई महानगरपालिकेने राष्ट्रीय समुद्री विज्ञान संस्थेच्या (एनआयओ) हवाल्याने केला होता. मात्र हे अंतर बोटींच्या आवागमनासाठी जीवघेणे ठरू शकते, असा मुद्दा उपस्थित करीत मच्छीमार संघटनांनी सागरी प्रकल्पाचे काम बंद पाडले होते. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मच्छीमार संघटनांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धाव घेतली होती. मुख्यमंत्र्यांनी नेमलेल्या समितीने अखेर दोन खांबांमधील अंतर १२० मीटर करण्यास मान्यता दिली होती. मात्र दोन खांबांमधील अंतर वाढविल्यामुळे आता बांधकामाचा कालावधी सहा महिन्यांनी वाढला आहे. प्रकल्पाची उर्वरित कामे पूर्ण झाली तरी वरळीजवळ समुद्रात उभारण्यात येणाऱ्या पुलाचे बांधकाम रखडण्याची चिन्हे असून प्रत्यक्षात प्रकल्प सुरू होण्यास आणखी काही महिन्यांचा कालावधी लागणार आहे. परिणामी, जून २०२४ पर्यंत हा पूल वाहतुकीसाठी खुला होऊ शकेल, असा दावा करण्यात आला आहे.
दुसरा बोगदा लवकरच पूर्ण होणार
या प्रकल्पांतर्गत २ महाबोगदे खणण्यात येत आहेत. बोगदे खणण्याच्या कामाला ११ जानेवारी २०२१ रोजी सुरुवात झाली होती. यानंतर पहिल्या बोगद्याचे खोदकाम १० जानेवारी २०२२ रोजी पूर्ण झाले. १ एप्रिल २०२२ पासून दुसऱ्या बोगद्याचे खोदकाम सुरू करण्यात आले. दुसऱ्या बोगद्याचे काम सुरू असताना यंत्रात झालेल्या बिघाडामुळे बोगदा खणण्यास उशीर झाला. मात्र आता हे काम व्यवस्थित सुरू असून केवळ ६० मीटर अंतर बोगदा खणण्याचे काम शिल्लक असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दिवसाला तीन ते चार मीटर बोगदा खणण्यात येतो. हा वेग असाच राहिला मे महिन्यातच बोगदा खणण्याचे काम पूर्ण होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.