मुंबई : नाना जोशी यांना पुण्याहून मुंबईतील सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा त्यांची प्रकृती कमालीची चिंताजनक होती. एकीकडे यकृताचा संसर्ग तर दुसरीकडे ह्रदय केवळ ३० टक्केच काम करत होते. महाधमनीच्या कार्यातही गुंतागुंत निर्माण झाली होती. त्यातच रुग्णाचे वय ७४ वर्षाचे, अशा परिस्थितीत डॉक्टरांनी झडप दुरुस्त केली तसेच मेंदूपर्यंतचा महाधमनीचा एक मोठा भाग बदललून रुग्णाचा जीव वाचवला.
सैफी रुग्णालयातील डॉ. अमित कराड, डॉ. अबीझर मंकड, डॉ. निमित शाह आणि डॉ. रुशी देशपांडे यांच्या पथकाने ७४ वर्षीय नानांवर ही जटिल शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या केली. या शस्त्रक्रियेत रुग्णाचे हृदयाचे झडप दुरुस्त करण्यात आले आणि मेंदूपर्यंतचा महाधमनीचा (ओराटा) एक मोठा भाग बदलण्यात आला, ज्यामुळे त्याचा जीव वाचवता आला. रुग्णाला सुरुवातीला पोटदुखीचा त्रास जाणवत होता. त्यामुळे त्याला पुण्यातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्याला यकृताच्या संसर्गाचे निदान झाले आणि त्यावर उपचार सुरू करण्यात आले. मात्र, तब्येत सुधारत नव्हती. अनेक वेळा सीटीस्कॅन करण्यात आले पण त्यामध्ये एओर्टिक डिसेक्शन (महाधमनी अकार्यक्षम असल्याचे) लक्षात आले नाही. सैफी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी तातडीने योग्य निदान करून शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला, ज्यामुळे रुग्णाचा जीव वाचवण्यात यश आले.
रुग्णाच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नसल्याने रुग्णाच्या नातेवाईकांनी सैफी हॉस्पिटलमधील डॉ. अबीझर मंकड यांच्याशी संपर्क साधला. तपासणीनंतर त्याला एओर्टिक डिसेक्शन म्हणजेच महाधमनी अकार्यक्षम असल्याचे तातडीने निदान करण्यात आले. त्याची स्थिती गंभीर असल्यामुळे, त्यांना ह्रदयशल्यचिकित्सक डॉ. अमित कराड यांच्याकेड दाखल करण्यात आले. त्यानंतर सीटी स्कॅन करण्यात आले. त्यात लक्षात आले की रुग्णाच्या हृदयातील महाधमनीचा आकार सामान्याच्या तीनपट वाढला होता आणि आतील भिंती पूर्णतः विभाजीत झाल्या होत्या. या गंभीर परिस्थितीमुळे यकृतावर परिणाम झाला असून एका किडनीचे कार्य पूर्णतः बंद पडले आणि दुसऱ्या किडनीवरही मोठा परिणाम झाला होता. तसेच, हृदयाची कार्यक्षमता केवळ ३० टक्के राहिली होती. याशिवाय, एओर्टिक वाल्व मध्ये गळती होती आणि यकृताचे एन्झाइम्स तसेच क्रिएटिनिन लेव्हल धोकादायक स्तरावर पोहोचले होते. त्यामुळे तातडीने शस्त्रक्रिया करणे अत्यंत धोकादायक ठरणार होते.
ह्रदयशल्यचिकित्सक डॉ.अमित कराड यांनी सांगितले, “आम्ही दुर्मिळ आणि प्रगत तंत्र वापरुन रुग्णाचे नैसर्गिक एओर्टिक वाल्व दुरुस्त केले. यात मेकॅनिकल किंवा टिश्यू व्हाल्व्हने बदलले नाही कारण जर नवीन झडप बसवली असती तर रुग्णाला आयुष्यभर औषधे घ्यावी लागली असती आणि काही दुष्परिणामही होऊ शकले असते.याशिवाय, हृदयापासून मानेपर्यंत आणि मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या रक्तवाहिन्यांची दुरुस्ती आणि पुनर्बांधणी करण्यात आली. ही प्रक्रिया अत्यंत जटिल असून रुग्णाचे शरीराचे तापमान २० अंश सेल्सिअस पर्यंत कमी करावे लागले आणि फक्त मेंदू वगळता संपूर्ण शरीराचा रक्तपुरवठा थांबवण्यात आला.
या शस्त्रक्रियेसाठी सैफी हॉस्पिटलचे इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. निमित शहा यांनी विशेष कॅथेटर तंत्राचा वापर केला. इको गाईडन्सच्या मदतीने महाधमनीचा खरा मार्ग ओळखण्यात आला, ज्यामुळे महाधमनीची अधिक अचूक पुनर्बांधणी करणे शक्य झाले, असे डॉ. अमित कराड यांनी सांगितले. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर, रुग्णाला पाच दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आणि त्याच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा दिसून आली. किडनी आणि यकृताचे कार्य पूर्ववत झाल्यानंतर रुग्णाला घरी सोडण्यात आले.