तक्रारीबाबत कारवाई न करणाऱ्या उपनिरीक्षाविरोधात चौकशीचे आदेश

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईः विलेपार्ले येथील ७४ वर्षीय विणा कपूर यांनी हत्येपूर्वी त्यांच्या मुलाविरोधात जुहू पोलीस ठाण्यात दोन तक्रारी केल्या होत्या. याप्रकरणी कारवाई न केल्याबद्दल जुहू पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कपूर यांनी वकिलामार्फत २३ आणि ३० नोव्हेंबर रोजी मुलाविरोधात दोन तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर ६ डिसेंबर रोजी त्याच मुलाने वीणा यांची हत्या केली.

जुहू पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानुसार चौकशी सुरू करण्यात आली असून उपनिरीक्षकावर ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. त्यात तक्रारीबाबत कोणती कारवाई केली? याबाबत विचारणा करण्यात आली आहे. वीणा कपूर यांच्या पहिला तक्रारीनंतर महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकाने सचिनला दूरध्वनी करून पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले होते. त्यावेळी त्याने आपण सध्या शहराबाहेर असून संबंधित प्रकरण दिवाणी स्वरूपाचे असल्याचे सांगितले होते. त्यानंतर संबंधित सहाय्यक पोलीस निरीक्षकाने एका उपनिरीक्षकाला या तक्रारीप्रकरणी चौकशी करण्यास सांगितले होते. पण त्याबाबत पुढे ठोस कारवाई झाली नाही. तक्रारीत वीणा यांनी मुलगा ठार मारण्याची धमकी देत असून त्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. तसेच छोटूकडून होणाऱ्या त्रासाबाबतही त्यांनी तक्रारीत नमुद केले होते.

हेही वाचा >>> आता पोलीस हवालदारपदासाठी तृतीयपंथीयांनाही अर्ज करणे शक्य

वीणा कपूर या विलेपार्ले येथील गरीबदास (कल्पतरू) सोसायटीमध्ये राहत होत्या. त्यांचा मोठा मुलगा अमेरिकेत वास्तव्यास आहे, तर लहान मुलगा सचिन हा त्यांच्यासोबत राहत होता. गेल्या काही दिवसांपासून विणा आणि सचिन यांच्यात मालमत्तेवरून प्रचंड वाद सुरू होता. हे प्रकरण न्यायप्रवीष्ट  असून खटल्याची एक प्रत वीणा कपूर यांनी सोसायटीला दिली होती. मंगळवारी सोसायटीचा सुरक्षा पर्यवेक्षक जावेद अब्दुल्ला मापारी यांनी वीणा कपूर बेपत्ता असल्याची तक्रार जुहू पोलिसांत केली होती. त्यांची तक्रार नोंदवून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. चौकशीत सचिनने त्याच्या आईसोबत मालमत्तेचा वाद झाल्याचे सांगितले. तसेच रागाच्या भरात तिला  बेदम मारहाण करून हत्या केल्याची कबुली दिली. हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने छोटूची मदत घेतली होती. वीणा यांचा मृतदेह एका खोक्यामध्ये भरून त्याने तिचा मृतदेह रायगडच्या माथेरानच्या दरीत फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या दोघांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी हत्या, पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला. याच गुन्ह्यांत बुधवारी सचिन गोवर्धनदास कपूर (४३) आणि छोटू ऊर्फ लालूकुमार मंडल (२५) या दोघांना जुहू पोलिसांनी अटक केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 74 years old woman file second complaint against son before six days of murder mumbai print news zws