मुंबई : भांडूप पश्चिम परिसरातील कक्कया शेट्टी मार्गावरील ७५ अनधिकृत बांधकामे बुधवारी मुंबई महानगरपालिकेने पाडून टाकली. यामध्ये ६२ घरे आणि १३ दुकानांचा समावेश आहे. या कारवाईमुळे हिंद रेक्टिफायर कंपनी ते कक्कय्या शेट्टी हा ३ मीटर अरुंद असलेला मार्ग आता १८.३० मीटर इतका रुंद झाला आहे.
मुंबई महानगरपालिकेने गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत बांधकामांवरील कारवाईला वेग दिला आहे. याच कारावाईअंतर्गत भांडूपमध्ये पालिकेच्या एस विभागाने कारवाई केली. हिंद रेक्टिफायर कंपनी ते कक्कय्या शेट्टी मार्ग दरम्यानचा रस्ता अतिक्रमणांमुळे ३ मीटर इतका अरुंद झाला होता. त्यामुळे या मार्गावरून लाल बहाद्दूर शास्री मार्गाकडे जाताना एका वेळी एकच वाहन जात होते. तसेच अनेक नागरिकांना गावदेवी, तुळशेतपाडा या ठिकाणी जाताना दोन किलोमीटरचा फेरा पार करून जावे लागत होते. ही बाब लक्षात घेता महानगरपालिकेने कारवाई हाती घेतली. हिंद रेक्टिफायर कंपनी ते कक्कय्या शेट्टी मार्ग दरम्यानचा ३ मीटर अरुंद असलेला रस्ता कारवाईनंतर १८.३० मीटर इतका रुंद झाला आहे. तसेच दोन किलोमीटर फेरा पार करण्याऐवजी नागरिकांना आता केवळ ५० मीटर अंतर पार करण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे.
मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. उप आयुक्त (परिमंडळ ६) संतोषकुमार धोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि एस विभागाचे सहायक आयुक्त भास्कर कसगीकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी दोन बुलडोझर, २ जेसीबी, दोन इतर वाहने, ८० कामगार, ३० अभियंते, १५ पोलीस इतका फौजफाटा तैनात होता.
कारवाईदरम्यान निष्कासित करण्यात आलेली ७५ बांधकामे तळमजला आणि त्यावर एक मजला अशा स्वरुपाची होती. त्यात ६२ घरे व १३ दुकाने होती. या ठिकाणी पात्र राहणाऱ्या नागरिकांचे यापूर्वीच पुनर्वसन करण्यात आले आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या सर्व यंत्रणांनी आपापसात समन्वय साधून तातडीने अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईला वेग द्यावा व मार्च अखेरपर्यंत अनधिकृत बांधकामांवर प्रभावीपणे धडक कारवाई करावी, असे निर्देश पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी नुकतेच दिले होते. तसेच अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याकामी कोणी चालढकल केल्याचे निदर्शनास आल्यास कठोर कारवाई केली जाईल, असाही इशारा जोशी यांनी दिला होता. त्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत अनधिकृत बांधकामांवरील कारवाईला वेग आला आहे.