मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील अभियंत्यांची तब्बल साडेसातशे पदे रिक्त असून ही पदे तातडीने भरावी, अशी मागणी अभियंत्यांच्या संघटनेने पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे केली आहे. पालिकेत कनिष्ठ अभियंत्यांची सुमारे ४००, तर दुय्यम अभियंत्यांची सुमारे ३५० अशी एकूण ७५० पदे रिक्त असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
मुंबई महानगरपालिकेत अभियंता हे पद महत्त्वाचे असून नागरी सुविधेपासून विविध विकासकामांसाठी अंदाजपत्रक बनवण्यापासून प्रत्यक्ष कामाची अंमलबजावणी करण्यापर्यंत व कामावर देखरेख ठेवण्याची कामे अभियंते पार पाडत असतात. मात्र बहुसंख्य अभियंते हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असून पदोन्नतीमुळे अभियंत्यांची पदे रिक्त होत आहेत. पालिकेत अभियंत्यांची ४,५०० पदे आहेत. मात्र सुमारे ७५० ते ८०० पदे रिक्त आहेत. ही पदे तातडीने भरावी, अशी मागणी बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनिअर्स युनियनने केली आहे.
हेही वाचा – मुंबई : शिधावाटप दुकानातील तांदळाचा काळाबाजार करणारे तिघे अटकेत
मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असल्यामुळे कामाचा अतिरिक्त भार अभियंत्यांना सोसावा लागतो, त्यामुळे त्यांना मानसिक ताणाला सामोरे जावे लागते. मुंबईत मोठ्या प्रमाणावर रस्ते, पूल अशी विकासकामे सुरू असून त्याकरीता अभियंते कमी पडू लागले आहेत. त्यातच सध्या मराठा आरक्षणाचे सर्वेक्षण करण्याकरीता अभियंत्यांची नेमणूक केली आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या अभियांत्रिकी कामांचा बोजवारा उडाला आहे, असे युनियनचे कार्याध्यक्ष साईनाथ राजाध्यक्ष यांनी सांगितले.
हेही वाचा – २२ हजारहून अधिक दहशवाद्यांची माहिती संकलित! ‘एनआयए’चा नवा डेटाबेस कार्यान्वित
रिक्त पदे भरण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १३ सप्टेंबर २०२२ रोजी पालिका आयुक्तांना निर्देश दिले आहेत. मात्र दीड वर्ष लोटल्यानंतरही ही पदे भरण्याची कार्यवाही केली जात नसल्याची खंत संघटनेचे सरचिटणीस यशवंत धुरी यांनी व्यक्त केली.