इंद्रायणी नार्वेकर, लोकसत्ता
मुंबई : महिन्याभरापासून सर्वाधिक रुग्णसंख्या असलेला भाग म्हणून ओळख मिळालेल्या वरळीत करोनामुक्त रुग्णांची टक्केवारी वाढली आहे. या भागातील बाधित रुग्णांपेक्षा रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या आता अधिक आहे. मंगळवापर्यंत ७५४ रुग्ण करोनामुक्त झाले, तर ५२६ रुग्ण बाधित आहेत. मुंबईतील करोनामुक्तीचा दर २६ टक्के असताना वरळीत मात्र करोनामुक्तीचे प्रमाण ५५ टक्के इतके आहे.
मुंबईतील करोनाचे अतिसंक्रमित क्षेत्र ठरलेल्या वरळी आणि प्रभादेवीचा समावेश असलेल्या जी दक्षिण विभागात सर्वाधिक रुग्ण सापडत होते. मुंबईतील रुग्णांच्या आकडेवारीत भागाचा पहिला क्रमांक होता. मात्र गेले काही दिवस या भागात रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी झाले असून करोनामुक्त होऊन घरी जाणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या भागातील बाधित रुग्णांची संख्या घटू लागली आहे.
करोनाने मुंबईत शिरकाव केला तेव्हा सुरुवातीला मुंबईतील एकूण रुग्णांपैकी २० टक्के रुग्ण हे वरळी प्रभादेवीतील असत. वरळी कोळीवाडा, जिजामाता नगर, बीडीडी चाळी, सातरस्ता, पोलिस कॅम्प या भागातून मोठय़ा प्रमाणावर रुग्ण बाधित झाले होते. कोळीवाडा प्रतिबंधित केल्यानंतर दाटीवाटीच्या घरात राहणाऱ्यांना संस्थात्मक अलगीकरणाचा प्रयोग सर्वात प्रथम वरळीत राबविला गेला. त्यानंतर वरळीच्या ‘एनएससीआय’मध्ये मोठय़ा प्रमाणावर विलगीकरण केंद्र स्थापन करण्यात आले आणि लक्षणे नसलेल्या रुग्णांवर तिथे उपचार करण्यात आले. या केंद्रातून दररोज मोठय़ा संख्येने रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत.
सध्या बाधित असलेल्या रुग्णांमध्ये ८४ रुग्ण हे केवळ आर्थर रोड तुरुंगातील आहेत.
रुग्ण सापडल्यानंतर त्याच्या संपर्कातील लोकांचा वेळीच शोध घेऊन त्यांना विलगीकरण केंद्रात ठेवणे, बाधित रुग्णांच्या प्रकृतीचा रोज पाठपुरावा करणे यामुळे जी दक्षिण विभागातील करोनामुक्तीची टक्केवारी वाढली आहे.
– शरद उघडे,
सहाय्यक आयुक्त, जी दक्षिण
१३५० वरळीतील एकूण रुग्ण
७५४ करोनामुक्त
५२६ सध्याचे बाधित
७० मृत्यू