मुंबईतील उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालक कार्यालयात पुरेशी कर्मचारी भरती झालेली नसून या कार्यालयातील विविध ७६ पदे रिक्त असल्याची माहिती उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारने ३८९ पदांना मंजुरी दिल्यानंतर आतापर्यंत ३१३ पदे भरण्यात आली. मात्र त्यातील कनिष्ठ लिपिकांची २२ पदे रिक्त असल्याचे माहिती उजेडात आली आहे. शिक्षकांच्या रिक्त पदांबरोबरच आता कर्मचाऱ्यांअभावी शिक्षण विभागातील कामे रखडल्याची ओरडही सुरू झाली आहे. 

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष चेतन पेडणेकर यांनी उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयातील पदांचा तपशीलवार आणि सहसंचालक पदावर किती जणांनी काम पाहिले यासंदर्भात उच्च शिक्षण सहसंचालकांकडे माहितीच्या अधिकारात अर्ज करुन माहिती मागविली होती. त्यात हा प्रकार उघडकीस आला आहे. सहसंचालक कार्यालयात ७६ जागा रिक्त असल्याचे समोर आले आहे. यात कनिष्ठ लिपिक पदांसाठी सर्वाधिक जागा रिक्त असून त्यापाठोपाठ प्रयोगशाळा सहाय्य १० आणि ग्रंथालय लिपीकांची नऊ पदे रिक्त असल्याचे आढळले आहे.
संपूर्ण आकडेवारीवर नजर टाकली असता सहसंचालक कार्यालयात एकूण ३८९ पदे मंजूर करण्यात आली असून त्यातील ३१३ पदे भरण्यात आली आहेत. उर्वरित ७६ पदे रिक्तच आहेत. या रिक्त पदांमुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर कामाचा बोजा वाढत असल्याची तक्रार काही दिवसांपूर्वी करण्यात येत होती. ही पदे अद्याप का भरण्यात आलेली नाही, याचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, वर्ग तीन लिपिक संवर्गातील रिक्त पदे व अपंग अनुशेषाची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत असल्याचे समजले. तर तांत्रिक संवर्गातील पदे भरण्यासाठी शिक्षण संचालकांमार्फत कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले.