‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (आयआयटी) या देशातील अग्रगण्य अभियांत्रिकी शिक्षण संस्थेतील तब्बल ७६९ जागा पहिल्या प्रवेश फेरीनंतर रिक्त राहिल्या आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे यापैकी बहुतेक जागा खुल्या प्रवर्गातील आहेत.आतापर्यंत आयआयटीच्या पहिल्या फेरीला रिक्त राहणाऱ्या जागांची संख्या फारच नगण्य असे. दुसऱ्या फेरीनंतर तर सर्व जागा भरून जात. ज्या काही जागा रिक्त असत त्या राखीव प्रवर्गातील असत. पण, या वर्षी खुल्या वर्गातील जागाही मोठय़ा प्रमाणावर रिक्त राहिल्या आहेत. अर्थात दुसऱ्या फेरीला ७६९ जागा रिक्त राहिल्याने अजुनही काही विद्यार्थ्यांची आयआयटी प्रवेशाची संधी कायम आहे.
बुधवारपासून दुसऱ्या प्रवेश फेरीला सुरुवात होईल. बेटरमेंटची शक्यता असल्याने अनेक विद्यार्थ्यांना मिळालेल्या जागेवर प्रवेश घेतलेला नाही. त्यामुळे, जागा रिक्त राहिल्या आहेत, असे जेईई-अ‍ॅडव्हान्स परीक्षेचे अध्यक्ष एच. सी. गुप्ता यांनी सांगितले.
सर्वच आयआयटीत थोडय़ाफार संख्येने जागा रिक्त आहेत. पण, सर्वाधिक रिक्त जागा धनबादच्या आयआयटीत आहेत. आतापर्यंत पहिल्या प्रवेश फेरीला इतक्या जागा रिक्त कधीच राहत नव्हत्या. २००९ला पहिल्या फेरीनंतर ५०५ जागा रिक्त राहिल्या होत्या. २०११ला ही संख्या ३०० होती. काही वर्षांपर्यंत तर आयआयटी दुसरी प्रवेश फेरीही घेत नव्हती. त्यामुळे, या जागा रिक्तच राहत. २००८ला आयआयटीने दुसरी प्रवेश फेरी घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे, रिक्त जागांची संख्या कमी होत
गेली.

वर्ष              रिक्त जागा
२०१२            ४
२०११            ६६
२०१०            ८७
२००९            ६७

Story img Loader