देशाची आर्थिक राजधानी मुंबई सध्या करोनाच्या संकटाशी तोंड देत आहे. मुंबईतील स्थिती करोनामुळे गंभीर बनली असून, रुग्णांची संख्या दहा हजारांच्याही पुढे गेली आहे. अशातच राज्य सरकारची चिंता वाढवणारी घटना समोर आली आहे. मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहात १०३ जण करोनाग्रस्त आढळून आले आहेत. यात ७७ कैद्यांसह २६ पोलिसांचा समावेश आहे.
राज्यात करोनाचा सर्वाधिक फटका मुंबईला बसला आहे. प्रमुख आर्थिक केंद्र असलेल्या मुंबईला करोनानं विळखा घातला असून, करोनाग्रस्त रुग्णांची संख्या वेगानं वाढत आहे. मुंबईतील करोना पॉझिटिव्ह असणाऱ्या रुग्णांचं प्रमाण १५ टक्के असून देशातील सरासरीच्या तुलनेत ते १२ टक्क्यांनी अधिक आहे.
दरम्यान, मुंबईतील करोनाचा प्रसार रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न होत असताना आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहातील काही कैदी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना करोनाचा संसर्ग झाला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याविषयी सविस्तर माहिती दिली. “मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहात सध्या २८०० कैदी आहेत. कारागृहातील एका बॅरिकमध्ये करोनाचा प्रार्दूभाव झाल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर कैदी आणि कर्मचाऱ्यांची तातडीनं तपासणी करण्यात आली. यात ७७ कैदी आणि २६ पोलीस कर्मचाऱ्यांना करोना झाल्याचं निष्पन्न झालं आहे. या १०३ जणांना सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे,” असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं.
मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहातील कैद्यांची आरोग्य तपासणी करण्यात आल्यानंतर एकूण ७७ कैदी तसेच २६ पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. या सर्वांना पुढील उपचारासाठी सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले असून क्वारंटईन करण्यात आले आहे – ना. @AnilDeshmukhNCP pic.twitter.com/VOMvwdVvcu
— NCP (@NCPspeaks) May 8, 2020
या घटनेनंतर राज्य सरकार ऑर्थर रोड तुरूंगात लॉकडाउन लागू करण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच गृह विभागानं राज्यातील महत्त्वाच्या तुरूंगांमध्ये लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेतला होता. याची अंमलबजावणी औरंगाबाद येथील हर्सूल कारागृहापासून करण्यात आली. त्याचबरोबर इतरही पाच कारागृहात लॉकडाउन करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असताना ऑर्थर रोडची घटना समोर आली आहे. त्यामुळे सरकार याविषयी प्रतिबंधात्मक पाऊल टाकू शकते.