मुंबई : आयफा ॲवॉर्ड्स सोहळा नुकताच संपन्न झाला आहे, फिल्मफेअरचे ओटीटी पुरस्कारही देऊन झाले आहेत आणि आता मुख्य सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे. या सगळ्या वार्षिक चित्रपट पुरस्कार सोहळ्यांच्या गर्दीत ‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाईट’, ‘अमर सिंग चमकीला’, ‘कोट्टुक्काळी’ (द ॲडमंट गर्ल), ‘लापता लेडीज’, ‘मंजुम्मल बॉईज’ अशा भिन्न भाषिक, तथाकथित व्यावसायिक चौकटीपासून दूर असलेल्या चित्रपटांमध्ये ‘सर्वोत्कृष्ट चित्रपट’ पुरस्कार मिळवण्याच्या स्पर्धेसाठी एकत्र आणत ‘क्रिटिक्स चॉईस ॲवॉर्ड्स’ने आपले वेगळेपण कायम राखले आहे.

‘फिल्म क्रिटिक्स गिल्ड’ या देशातील पहिल्या नोंदणीकृत चित्रपट समीक्षक संघटनेच्या वतीने दरवर्षी क्रिटिक्स चॉईस ॲवॉर्ड्स दिले जातात. यंदा या पुरस्कार सोहळ्याचे सातवे पर्व असून त्यासाठीची विविध विभागातील नामांकने जाहीर करण्यात आली आहेत. लघुपट, वेबमालिका आणि चित्रपटांमधील विविध विभागातील सर्वोत्तम प्रतिभेचा सन्मान करणाऱ्या या पुरस्कार सोहळ्यात यंदा उत्कृष्ट माहितीपटांसाठीही पुरस्कार दिला जाणार आहे. ‘७ व्या क्रिटिक्स चॉईस ॲवॉर्ड्स’ची घोषणा करताना आम्हाला अत्यानंद होतो आहे. विशेषत: यावर्षीपासून भारतीय माहितीपटांसाठीही पुरस्कार सुरू करण्यात आले आहेत हे महत्त्वाचे वाटते. भारतीय सिनेमाच्या आजवर दुर्लक्षित पण महत्वपूर्ण अशा प्रकाराला योग्य सन्मान देण्याचा आमचा प्रयत्न आहे’ अशी माहिती फिल्म क्रिटिक्स गिल्डच्या अध्यक्षा अनुपमा चोप्रा यांनी दिली. यावर्षी विविध भाषेतील उत्तम चित्रपट, कलाकार यांना या नामांकन श्रेणीत स्थान मिळाले आहे.

यावर्षी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक विभागात ‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाईट’ची दिग्दर्शिका पायल कपाडिया, ‘अमर सिंग चमकीला’ चित्रपटासाठी दिग्दर्शक इम्तियाज अली, ‘गर्ल्स विल बी गर्ल्स’ चित्रपटासाठी दिग्दर्शिका शुची तलाटी, ‘मंजुम्मल बॉईज’चा दिग्दर्शक चिदंबरम आणि ‘रॅप्चर’चा दिग्दर्शक डॉमिनिक सांगमा यांच्यात चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. तर सर्वोत्तम अभिनेत्री म्हणून कनी कुसरुति (ऑल वुई इमॅजिन ॲज लाईट), प्रीती पाणिग्रही (गर्ल्स विल बी गर्ल्स), ॲना बेन (कोट्टुकाळी), दर्शना राजेंद्रन (पॅराडाईस) आणि उर्वशी (उल्लोजुक्कू) यांना नामांकने जाहीर करण्यात आली आहेत. सर्वोत्तम अभिनेता या पुरस्कारासाठी पृथ्वीराज सुकूमारन (आदुजीविथम), दिलजीत दोसांज (अमर सिंग चमकीला), अभिषेक बच्चन (आय वॉँट टु टॉक), सूरी (कोट्टुकाळी) आणि चंदन सेन (माणिकबाबुर मेघ) यांना नामांकने जाहीर करण्यात आली आहेत.

वेबमालिकांसाठी जाहीर झालेल्या विविध नामांकनांमध्ये मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर हिला ‘मानवत मर्डर्स’ या वेबमालिकेतील भूमिकेसाठी सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री विभागात नामांकन मिळाले आहे. तर ‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाईट’ चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी सर्वोत्तम अभिनेत्री, ‘गर्ल्स विल बी गर्ल्स’ चित्रपटातील भूमिकेसाठी सहाय्यक अभिनेत्री आणि ‘पोचर’ या वेबमालिकेसाठी सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री अशा तीन विभागात कनी कुसरुति हिला नामांकने जाहीर झाली आहेत. तर वेबमालिकेसाठीच सर्वोत्तम अभिनेता या यादीत रवी किशन (मामला लीगल है), वरुण सोबती (रात जवान है), के. के. मेनन (शेखर होम), ताहिर राज भसीन (ये काली काली आँखे २) यांच्याबरोबरीने ‘लंपन’ मालिकेतील भूमिकेसाठी बालकलाकार मिहिर गोडबोले यालाही नामांकन जाहीर झाले आहे. २५ मार्च २०२५ रोजी क्रिटिक्स चॉईस ॲवॉर्ड सोहळा भव्य स्वरुपात पार पडणार आहे.