मुंबई : देशभरातील बाजार समित्यांत ऑक्टोबर ते डिसेंबर २०२४ या सोयाबीन विक्रीच्या मुख्य काळात ४६ लाख टन सोयाबीनची आवक झाली. त्यापैकी डिसेंबरअखेर ‘नाफेड’च्या वतीने देशभरातील विविध खरेदी केंद्रांवर ८.१२ लाख टन सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्यात आली. उर्वरीत ३७.८८ लाख टन सोयाबीन कवडीमोड दराने खासगी बाजारात विकला गेला. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ४०० रुपयांचा फटका बसला आहे.

‘सोयाबीन असोशिएशन ऑफ इंडिया’ने (सोपा) दिलेल्या माहितीनुसार, गेल्यावर्षी देशात सुमारे १२५.८२ लाख टन सोयाबीनचे उत्पादन झाले. त्यापैकी ४६ लाख टन सोयाबीनची ऑक्टोबर ते डिसेंबर २०२४, या काळात देशभरातील विविध बाजार समित्यांमध्ये आवक झाली. नाफेडने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबरअखेर ८ लाख १२ हजार ३२२ टन सोयाबीनची हमीभावाने खरेदी झाली. त्यापैकी मध्य प्रदेशातून ३.८८ लाख टन, महाराष्ट्र २.६२ लाख टन, तेलंगणा ७७ हजार टन, राजस्थान ३७ हजार टन, गुजरातमधून २९ हजार टन आणि कर्नाटकातून १५ हजार टन सोयाबीनची खरेदी झाली आहे.

हेही वाचा…राज्यात ईएसआयसी १८ नवी रुग्णालये उभारणार, रायगडमध्ये सर्वाधिक चार रुग्णालये, भूसंपादनाची प्रक्रिया सुरू

नाफेडने केलेली खरेदी हमीभावाने म्हणजे ४ हजार ८९२ रुपये प्रतिक्विंटल दराने झाली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या सोयाबीन विक्रीच्या प्रमुख हंगामात देशातील बाजार समित्यांमध्ये आवक झालेल्या ४६ लाख टनपैकी फक्त आठ लाख टन सोयाबीनची हमीभावाने खरेदी झाली आहे. उर्वरीत सुमारे ३७.८८ लाख टन सोयाबीन कवडीमोल दराने खासगी बाजारात विकले गेले. खासगी बाजारात सोयाबीनला ४ हजार ३०० ते ४ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

हेही वाचा…बीकेसीत आजपासून तीन दिवसीय मालमत्ता प्रदर्शन, एकाच ठिकाणी घरखेरदीचे पर्याय उपलब्ध होणार

सोयाबीनच्या हमीभावापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. केंद्र सरकारने भावांतर योजनेची घोषणा केली आहे. त्यानुसार बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची विक्री केलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी मागवून दर फरकाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची गरज आहे. दीपक चव्हाण, शेतीमालाच्या बाजार व्यवस्थेचे अभ्यासक हमीभाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ४०० रुपयांचा फटका बसला आहे. याचा सर्वाधिक फटका मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बसला आहे.

Story img Loader