मानखुर्दच्या नवजीवन सुधारगृहातून सोमवारी पहाटे पुन्हा आठ तरुणी सुधारगृहाची भिंत ओलांडून पळून गेल्या. सकाळी सातच्या सुमारास हा प्रकार घडला. भिंत ओलांडण्याच्या प्रयत्नात या पैकी एक महिला खाली पडून जखमी झाल्यामुळे तिला पकडण्यात सुधारगृहाच्या कर्मचाऱ्यांना यश आले. या पूर्वीही सप्टेंबरमध्ये १७, तर नोव्हेंबरमध्ये २२ तरुणींनी या सुधारगृहातून पलायन केले होते.
सोमवारी पहाटे पाच ते साडेपाचच्या दरम्यान सुधारगृहातील नऊ तरुणींनी शौचालयातील खिडकीची जाळी कापली आणि त्यांनी मागील बाजूस असलेल्या पाच फूट उंचीच्या भिंतीवरून उडी मारून पळ काढला. या प्रयत्नात खाली पडून जायबंदी झालेल्या तरुणीवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या सुधारगृहात सध्या शंभरहून अधिक महिला आणि तरुणी आहेत.
सुधारगृहाला पुरेशी संरक्षक भिंत नाही. भिंत बांधण्यासाठी ६५ लाखांचा प्रस्ताव देण्यात आला होता; परंतु तो अद्याप सार्वजनिक बांधकाम खात्याकडे धूळ खात पडून असल्याचे महिला बालविकास मंत्री वर्षां गायकवाड यांनी सांगितले. दरम्यान, या पलायन प्रकरणी जिल्हा माहिला बालविकास अधिकारी आनंद खंडागळे, माजी अधीक्षिका नीरू शर्मा, उपायुक्त रवी पाटील यांना निलंबित करण्यात आले असून उपायुक्त पोखरकर यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
नवजीवन सुधारगृहातून आणखी आठ तरुणींचे पलायन
मानखुर्दच्या नवजीवन सुधारगृहातून सोमवारी पहाटे पुन्हा आठ तरुणी सुधारगृहाची भिंत ओलांडून पळून गेल्या. सकाळी सातच्या सुमारास हा प्रकार घडला. भिंत ओलांडण्याच्या प्रयत्नात या पैकी एक महिला खाली पडून जखमी झाल्यामुळे तिला पकडण्यात सुधारगृहाच्या कर्मचाऱ्यांना यश आले.
First published on: 04-12-2012 at 04:18 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 8 girls escaped from navjeevan women rehab center