दिवसाला ७० हजारऐवजी केवळ २७ हजार वाहने धावतात * एमएमआरडीएला महसुलाची चिंता,
मुंबई पारबंदर प्रकल्प अर्थात अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू वाहतूक सेवेत दाखल होऊन मंगळवारी एक महिना पूर्ण झाला असून अद्यापही या सेतूच्या वापरास अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याच दिसते आहे. या सागरी सेतूवरुन दिवसाला ७० हजार वाहने धावतील असा दावा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) केला आहे. मात्र महिन्याभरात या सागरी सेतूवरुन ८ लाख १३ हजार ७७४ वाहने धावली असून दिवसाला सरासरी २७ हजार वाहने धावत आहेत.
मुंबई आणि नवी मुंबईला जोडण्यासाठी एमएमआरडीएने शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू प्रकल्प हाती घेतला आणि नुकताच हा प्रकल्प पूर्ण करत वाहतूक सेवेत दाखल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सेतूचे १२ जानेवारीला लोकार्पण झाले आणि १३ जानेवारी सकाळी ८ वाजता हा सागरी सेतू वाहतूकीसाठी खुला झाला. सागरी सेतू वाहतूकीला खुल्या झाल्यानंतर दुसर्या दिवशी अर्थात १४ जानेवारीला या सागरी सेतूवरुन तब्बल ५४ हजार ९७७ वाहनांनी प्रवास केला आहे. या सागरी सेतूला चांगला प्रतिसाद मिळेल, दिवसाला ७० हजार वाहनांची अपेक्षात असताना ५० हजार वाहने तरी धावतील असे वाटत होते. पण प्रत्यक्षात सागरी सेतू वाहतूक सेवेत दाखल होऊन एक महिना झाल्यानंतर एमएमआरडीएची ही अपेक्षा पूर्ण झालेली नाही.
हेही वाचा >>> पसंतीच्या वाहन क्रमांकातून ४१ लाखांचा महसूल
कर्जाची चिंता
या सागरी सेतूसाठी जायकाकडून १७ हजार कोटींचे कर्ज घेण्यात आले असून २०२८ पासून कर्जाची परतफेड करण्यास सुरुवात होणार आहे. अशावेळी या सागरी सेतूवरुन कमी वाहने धावत असल्याने साहजिकच महसूलही कमी मिळत आहे. आतापर्यंत १३ कोटी ९५ लाख ८५ हजार ३१० रुपये इतका महसूल वसूल केला आहे. वाहनांची संख्या वाढली नाही तर एमएमआरडीएला कर्जाची परतफेड करण्यात अडचणी येण्याची शक्यता असून याला महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी दुजोरा दिला आहे. पथकर अधिक असल्याने वाहने कमी धावत असल्याचे सांगितले जात असले तरी उलवे आंतरबदल, शिवडी-वरळी उन्नत रस्ता आणि चिर्ले-कोन जोडरस्ता पूर्ण झाल्यानंतर वाहनांची संख्या वाढेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
सागरी सेतूवरुन महिन्याभरात धावलेल्या ८ लाख १३ हजार ७७४ वाहनांपैकी ७ लाख ९७ हजार ५७८ वाहने चारचाकी आहेत. तर ३ हजार ५१६ मिनी बस आणि इतर वाहनांचा यात समावेश आहे. दरम्यान तीन टक्के वाहनचालक पथकर भरत नसल्याचीही बाब समोर आली आहे. पथकर न भरता प्रवास करणार्यांना रोखण्यासाठीही आता एमएमआरडीएकडून ठोस उपायोजना केली जाणार असल्याचेही डाँ मुखर्जी यांनी सांगितले.