मुंबई सर्वाधिक सुरक्षित शहर असल्याचं म्हटलं जातं. परंतु, मुंबईत होत असलेले महिला अत्याचार सातत्याने समोर येत आहेत. धक्कादायक म्हणजे हे अत्याचार अनोळखी लोकांकडून न होता ओळखीच्या व्यक्तींकडूनच होत आहेत. मुंबईतील जोगेश्वरी परिसरातही असाच धक्कादायक प्रकार घडला आहे.
आठ वर्षीय चिमुकली पीडिता तिच्या आईसोबत जोगेरश्वरी येथे राहते. तिची आई विश्वासाने आपल्या मुलीला शेजाऱ्यांकडे ठेवून कामाला जात असे. घरात मुलीची देखरेख करण्यासाठी कोणी नसल्याने आई मुलीला शेजाऱ्यांकडे ठेवत होती. परंतु, याचा फायदा नराधमाने घेतला. ५३ वर्षीय नराधमाने या आठ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार केला. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
काही दिवसांपूर्वी घडलेली आपबिती या आठ वर्षीय चिमुकलीने आपल्या आईला सांगितली. त्यामुळे आईने तत्काळ पोलिसांत धाव घेऊन संबंधित आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पीडिता आणि तिच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी कलम ३७६ आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून घेतला आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.