पावसाळ्यात अनधिकृत झोपडय़ांवरील कारवाई जवळपास बंद असल्याचा फायदा घेत मुंबईत जागोजागी अनधिकृत झोपडय़ा तसेच झोपडय़ांवर मजले चढविण्याचे काम सुरू आहे. मात्र वांद्रे येथील रंगशारदा सभागृहाच्या मागे असलेल्या एका मोठय़ा नाल्यातच ८० अनधिकृत झोपडय़ा गेल्या काही दिवसांमध्ये बांधण्यात आल्या आहेत. या झोपडय़ांवर कारवाई न झाल्यास पावसामुळे वांद्रे रेक्लमेशन आणि तेथील संक्रमण शिबिराचा परिसर जलमय होण्याची भीती स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केली .
वांद्रे रेक्लमेशन येथील राहुल नगर झोपडपट्टीमागे असलेला नाल्याचा भाग राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ताब्यात असून महापालिका व पोलीस या अतिक्रमणाकडे बघ्याच्या भूमिकेतून पाहात आहेत. या संपूर्ण परिसरातील पाणी या नाल्यातून समुद्रात जात असतानाही स्थानिक झोपडपट्टीदादांनी पावसाळ्यातच या नाल्यामध्ये झोपडय़ा बांधल्या आहेत. आतापर्यंत सुमारे ८० अनधिकृत झोपडय़ा याठिकाणी बांधण्यात आल्या आहेत.
याबाबत मनसेचे स्थानिक विभाग अध्यक्ष तुषार आफळे यांनी पालिकेकडे तक्रार केली तेव्हा सदर जागा आमच्या मालकीची नव्हे ‘एमएसआरडीसी’ ची असल्याचे उत्तर मिळाले. पोलिसांनी डोळ्यावर पट्टय़ा बांधल्या असून तक्रार आल्यानंतर पोलीसबळ असेल तरच कारवाई होणार हे चित्र आहे. या पाश्र्वभूमीवर आफळे यांनी एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून त्यांनाही तक्रार दाखल करण्यास सांगितले आहे. सध्या या झोपडय़ांमध्ये कोणीही राहात नसून पोलीस व पालिकेने कारवाई केली नाही तर मनसे आपल्या स्टाईलने या अनधिकृत झोपडय़ांवर कारवाई करेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. यापूर्वीही येथील राज्य शासनाच्या मोकळ्या जागेवर झोपडय़ा बांधण्यात आल्या होत्या. त्यावेळीही या झोपडय़ा पाडण्यात आल्या होत्या. परंतु नाल्यातच झोपडय़ा उभ्या राहत असल्यामुळे उद्या हा संपूर्ण परिसर पावसाळ्यात जलयम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मनसे हा लढा लढत असताना स्थानिक नगरसेवक व आमदार बाबा सिद्दिकी गप्प का, असा सवाल करण्यात येत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा