‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’च्या सूत्रांची धक्कादायक माहिती
रशिया, तुर्की, चीन आदी देशांमध्ये जाऊन डॉक्टर बनलेले भारतीय विद्यार्थी भारतात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या प्रवेश परीक्षेत जवळपास ८० टक्के विद्यार्थी नापास होत असल्याची धक्कादायक माहिती ‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’च्या सूत्रांनी दिली. या देशांमधील वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा भिन्न असून केवळ लेखी परीक्षा न घेता या डॉक्टरांची क्लिनिकल चाचणीही घेणे आवश्यक असल्याचे मत वैद्यकीय अध्यापक क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.
भारतातील वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्यांना सामायिक अथवा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात. या उत्तीर्ण झाल्यास शासकीय तसेच खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळतो. अन्यथा खासगी महाविद्यालयांमध्ये डोनेशन भरून विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावा लागतो.
जे विद्यार्थी अशा परीक्षा उत्तीर्ण होत नाहीत अथवा ज्यांच्याकडे डोनेशन देऊन प्रवेश घेण्याची आर्थिक परिस्थिती नसते असे अनेक विद्यार्थी रशिया, टर्की तसेच चीन आदी देशांतील वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात. यासाठी त्यांना तेथील भाषा शिकावी लागते. तसेच तेथेही शासकीय तसेच खासगी वैद्यकीय महाविद्यालये असून त्यांच्या शैक्षणिक दर्जाबाबत
संदिग्धता असल्यामुळे परदेशातून शिकून येणाऱ्या डॉक्टरांना भारतात व्यवसाय करायचा असल्यास ‘एमसीआय कायदा २००१’नुसार ‘नॅशनल बोर्डा’ची पात्रता परीक्षा देणे बंधनकारक करण्यात आले आहे. भारतात वैद्यकीय पदवीधारकास ‘एमबीबीएस’ची पदवी मिळत असून रशियात याच पदवीला ‘एमडी’ म्हटले जाते.
त्यामुळे येथे येऊन व्यवसाय करणारे डॉक्टर ‘एमडी’ची पाटी लावून व्यवसाय करत असले तरी त्यांचे ज्ञान हे वैद्यकीय पदवीचेच असते. त्यातही तेथील दर्जा व शैक्षणिक गुणवत्ता
आपल्याकडील गुणवत्तेशी मिळतीजुळती असेलच असे नाही ही बाब लक्षात घेऊन लेखी पात्रता परीक्षा घेण्यात येते. त्यामुळे भारतातील ही पात्रता परीक्षा विदेशातून
आलेल्या विद्यार्थ्यांना कठिण जात असल्याचे चित्र आहे. त्यातच रुग्णानुभव परीक्षाही आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा