मुंबई : राज्यातील हिवताप व डेंग्यूच्या साथीला आळा घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र तरीही अधूनमधून होणारा पाऊस आणि वाढते तापमान यामुळे अवघ्या १० दिवसांमध्ये हिवताप व डेंग्यूचे मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडले आहेत. २८ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर या १० दिवसांमध्ये हिवतापाचे ६२५, तर डेंग्यूचे ८४५ रुग्ण सापडले आहेत.

सप्टेंबरपासून अधूनमधून कोसळणारा मुसळधार पाऊस आणि पडणारे कडक उन यामुळे मागील काही दिवसांमध्ये राज्यात सर्दी, तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे. यामध्ये हिवताप व डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्या अधिक असल्याचे राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले. या आकडेवारीनुसार २८ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर या १० दिवसांत राज्यामध्ये हिवतापाचे ६२५ रुग्ण सापडले आहेत. मुंबईमध्ये हिवतापाचे सर्वाधिक २७३ रुग्ण सापडले आहेत. त्याखालोखाल गडचिरोलीमध्ये १३४ आणि ठाण्यामध्ये २९ रुग्ण सापडले आहेत. मात्र या कालावधीमध्ये हिवतापाने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. राज्यामध्ये आतापर्यंत हिवतापाचे १५ हजार ६८२ रुग्ण सापडले आहेत.

हेही वाचा >>>युरोपातील बल्लवाचाऱ्याची नोकरी पडली पावणेआठ लाखांना

हिवतापाप्रमाणे डेंग्यूच्या रुग्णांमध्येही माेठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. राज्यामध्ये या सात दिवसांमध्ये डेंग्यूचे ८४५ रुग्ण सापडले आहेत. यामध्ये मुंबईमध्ये सर्वाधिक २७८ रुग्णांची नोंद झाली असून, त्याखालोखाल नाशिकमध्ये ५०, काेल्हापूरमध्ये ४२, पालघरमध्ये १८, कल्याणमध्ये १६ आणि गडचिरोलीमध्ये ११ रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यामध्ये आतापर्यंत डेंग्यूचे १४ हजार ४३९ रुग्ण सापडले आहेत.

हेही वाचा >>>पाण्यासाठी आता भाजपच्या माजी नगरसेवकांचेही आंदोलन; माहीम आणि मुलुंडमध्ये धरणे

चिकुनगुन्याच्या रुग्णसंख्येत वाढ कायम

राज्यात सप्टेंबरमध्ये अचानक चिकुनगुन्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. चिकुनगुन्याच्या रुग्णसंख्येत वाढ होतच आहे. राज्यामध्ये २८ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर या १० दिवसांमध्ये ४३४ चिकुनगुन्याचे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे हिवताप, डेंग्यूबरोबरच चिकुनगुन्याच्या रुग्णांमध्येही ऑक्टोबरच्या सुरुवातील वाढ झाल्याचे आढळले. सप्टेंबरमध्ये राज्यामध्ये १ हजार ६१ रुग्ण सापडले. जानेवारीपासून आतापर्यंत राज्यामध्ये चिकुनगुन्याचे ३ हजार २५९ रुग्ण सापडले आहेत. पुण्यामध्ये २२७ रुग्ण सापडले असून, येरवडा, नगर रोड, घोळे रोड या परिसरात अधिक रुग्ण सापडले आहेत. या ठिकाणी केलेल्या तपासणीमध्ये १३८ जणांना नोटीस देण्यात आली असून दंडात्मक कारवाईच्या माध्यमातून ४१ हजार ७०० रुपये वसूल करण्यात आले आहेत.