मुंबई : बांगलादेशातील राजकीय अस्थिरता व तेथील हिंदूवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे भारतातील राजकीय वातावरणही संवेदनशील होवू लागले आहे. या काळात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिक भारतात घुसखोरी करीत असून मुंबई पोलिसांनाही बांगलादेशी नागरिकांविरोधात विशेष मोहीम राबवत आहेत. त्याअंतर्गत वर्षाच्या पहिल्या १० दिवसांतच ८१ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. गेल्या तीन वर्षांत मुंबईतून ९०० हून अधिक बांगलादेशी नागरिकांना पकडण्यात आले आहे.
देशात अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात मुंबई पोलीस विशेष मोहीम राबवत असून त्याअंतर्गत गेल्यावर्षी एकट्या मुंबईतून ३०४ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली होती. त्यापूर्वी २०२३ मध्ये मुंबईतून ३७६ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली होती. या कारवायांदरम्यान, बहुसंख्य बांगलादेशी नागरिकांनी बनावट कागदपत्रांद्वारे भारतीय आधारकार्ड व पारपत्र बनवल्याचे आढळून आले आहे. गेल्या तीन वर्षांत मुंबई पोलिसांनी सुमारे ९०३ बांगलादेशी नागरिकांना अटक केली. परंतु न्यायालयीन प्रक्रियेमुळे केवळ २२२ बांगलादेशी घुसखोरांना मायदेशी पाठवता आले. यावर्षी पहिल्या १० दिवसांतच मुंबई पोलिसांनी ८१ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी ५२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अटक बांगलादेशी नागरिकांमध्ये ६२ पुरूष आणि १९ महिलांचा समावेश आहे.
हेही वाचा >>>आरटीई प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू ; ३२७ शाळांमध्ये ६ हजार ५३ जागा उपलब्ध
बांगलादेशी नागरिकांना अटक केल्यानंतर त्यांना मायदेशी पाठण्याच्या प्रक्रियेला अनेक वर्षे लागतात. त्या काळात घुसखोर बांगलादेशी नागरिक विविध सरकारी योजनांचा फायदा घेतात. त्यांच्या बँक खात्यातून बेकायदा व्यवहारही झाल्याचे दिसून आले आहे. याशिवाय अनेक बांगलादेशी भारतात स्थिर झाल्यानंतर ते इतर बांगलादेशी घुसखोरांना भारतात स्थायिक करण्याचे बेकायदेशीर काम करतात. त्यामुळे घुसखोरांना कागदपत्रे व मदत पुरवणाऱ्या संपूर्ण साखळीविरोधातच कारवाई करण्यास एटीएसने सुरूवात केली आहे. त्या अंतर्गत संशयीत बांगलादेशी नागरिकांची बँक खाते बंद करण्याबाबत बँकांना नोटीस पाठवण्यास सुरूवात करण्यात आली आहे. याशिवाय भारतीय शिधावाटप पत्रिका, चालकपरवाने रद्द करण्याबाबतही संबंधित विभागांशी पत्रव्यवहार करण्यात येतो. याशिवाय परिवहन विभागाशीही संपर्क साधून अशा संशयीतांचे चालकपरवानेही रद्द करण्यात येत आहेत. त्यामुळे बांगलादेशी घुसखोरांचे भारतातील वास्तव्यावर मर्यादा आणण्याचे काम हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी बांगलादेशी घुसखोरांची सर्वबाजूंनी कोंडी करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
——————————————————————
वर्ष – गुन्हे दाखल – अटक – पुरूष – महिला – मुले
——————————————————————
२०२३ – २२३ – ३७१ – ५८ – ८ – १
२०२४ – २१६ – ३०४ – १४३ – १८ – ३
२०२५ – ५२ – ८१ – ६२ – १९ – –