लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : दरवर्षीच्या तुलनेत यंदा मार्चमध्ये उन्हाचा तडाखा अधिक असून त्याचा फटका पक्ष्यांनाही बसला आहे. मार्चच्या पहिल्या पंधरवड्यात उन्हाच्या तडाख्यामुळे ५७ पक्षी जखमी झाले होते. मागील १५ दिवसांमध्ये आणखी २४ पक्षी जखमी झाले असून मार्चमधील एकूण जखमी पक्ष्यांची संख्या ८१ वर पोहचली आहे.
मार्चमध्ये अनेकदा तापमान ३८ डिग्री सेल्सियसपर्यंत पोहचले होते. वाढत्या तापमानामुळे लोकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. सार्वजनिक आरोग्य विभागानेही ‘उष्माघाता’चे प्रमाण रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वेही जाहीर केली आहेत. मार्चमधील वाढत्या तापमानाचा फटका नागरिकांबरोबरच पक्ष्यांनाही बसला आहे. मार्चमध्ये ८१ पक्षी जखमी झाले आहेत. यामध्ये घारीचे प्रमाण सर्वाधिक आहे. मुंबईच्या विविध ठिकाणी जखमी झालेल्या प्राण्यांमध्ये ३७ घारींचा समावेश आहे. त्याखालोखाल कबुतर (२२), कावळे (१७), पोपट (४) आणि बदक (एक) यांचा समावेश आहे. या सर्व पक्ष्यांवर परळ येथील दी बाई साकरबाई दिनशॉ पेटीट हॉस्पिटल फॉर ॲनिमल रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. काही पक्ष्यांना उपचार करून अधिवासात सोडण्यात आले. तर काहींवर अद्याप उपचार सुरू असल्याचे रुग्णालयाचे व्यवस्थापक डॉ. मयूर डांगर यांनी सांगितले.
पक्ष्यांना त्रास होणार
पक्षी आकाशात उंचावर उडत असतात. त्यामुळे त्यांना थेट उन्हाचा सामना करावा लागतो. तसेच शहरी भागामध्ये त्यांना लवकर पाणी मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण कमी होऊन त्यांना निर्जलीकरणाचा त्रास होतो आणि ते बेशुद्ध पडतात. अनेक पक्षी आकाशात उडताना अचानक खाली कोसळतात, तर काही पक्षी झाडांवरून खाली पडून जखमी होतात.
दरवर्षीच्या तुलनेत यंदा जखमींचे प्रमाण अधिक
दरवर्षी मार्चमध्ये पक्षी जखमी होण्याचे प्रमाण तुलनेत फारच कमी असते. दरवर्षी साधारणपणे २० ते ३० पक्षी जखमी होतात. मात्र यंदा हे प्रमाण बरेच वाढले असून, मार्चमध्ये ८१ पक्षी जखमी झाले आहेत.
पक्ष्यांवर असे होतात उपचार
उन्हामुळे पक्ष्यांना निर्जलीकरणाचा त्रास होतो. त्यामुळे जखमी अवस्थेत आणलेल्या पक्षांच्या शरीराचे तापमान अधिक असते. तसेच त्यांना ताप असण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांना थंड पिंजऱ्यामध्ये ठेऊन त्यांच्यावर उपचार केले जातात. आवश्यकता भासल्यास त्यांना आयव्ही सुद्धा चढविली जाते.
पक्ष्यांसाठी छतावर पाणी ठेवण्याचे आवाहन
पक्षी हे आकाशात उंचावर उडत असल्याने त्यांना उन्हाचा थेट फटका बसतो. त्यामुळे नागरिकांनी आपल्या घराच्या छतावर, सज्जामध्ये पक्षांसाठी मोठ्या भांड्यामध्ये किंवा मातीच्या भांड्यामध्ये पाणी ठेवावे. तसेच घारी मानवी वस्ती असलेल्या ठिकाणी येत नसल्याने त्यांच्यासाठी इमारतीच्या गच्चीवर मोठ्या भांड्यात पाणी ठेवावे. जेणेकरून काही पक्षांना या भांड्यामध्ये अंघोळ करता येऊ शकते. पाळीव प्राण्यांना उन्हामध्ये बाहेर काढू नये. तसेच त्यांना तळलेले व मसालेदार, मासांहारी पदार्थ खाण्यासाठी देऊ नये, असे आवाहन डॉ. मयुर डांगर यांनी केले आहे.