साहित्य महामंडळाची दुटप्पी भूमिका
महाबळेश्वरला झालेल्या ८२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास निवडून आलेले संमेलनाध्यक्ष डॉ. आनंद यादव उपस्थित राहिले नव्हते तरी ते अधिकृत तर घटनात्मक वैधतेबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झालेल्या चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनास महामंडळाचे सर्व ‘वऱ्हाड’ जाऊ शकले नाही, म्हणून ते अनधिकृत ठरले आहे. दोन्ही साहित्य संमेलनाबाबत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने घेतलेल्या दुटप्पी भूमिकेची चर्चा साहित्य वर्तुळात सुरू आहे.
महाबळेश्वरच्या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. आनंद यादव संमेलनास उपस्थित राहिले नव्हते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आजवरच्या इतिहासात संमेलनाचा अध्यक्षच संमेलनास उपस्थित नाही, असे पहिल्यांदा घडले होते. तरीही महामंडळ व महाबळेश्वर येथील निमंत्रक संस्थेने आयोजित केलेले हे संमेलन अधिकृत ठरले. तर दुसरीकडे मुळातच वादग्रस्त आणि घटनाबाह्य असलेल्या चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनास महामंडळाचे सर्व ‘वऱ्हाड’ जाऊ शकले नाही, म्हणून ते महामंडळाचे अधिकृत संमेलन नाही, अशी दुटप्पी भूमिका घेत महामंडळाने ते संमेलन अनधिकृत ठरविल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीत निवडून येऊनही वादग्रस्त ठरलेल्या ‘संतसूर्य तुकाराम’ या कादंबरीमुळे डॉ. आनंद यादव यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे महाबळेश्वर येथे झालेल्या ८२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास ते अनुपस्थित होते. तरीही हे संमेलन ‘कौतिका’ने पार पडले आणि ते संमेलन अधिकृतही ठरले. टोरांटो येथे होणाऱ्या चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनास महामंडळ आणि टोरांटो येथील संयोजक याच्या मानापमान नाटय़ात महामंडळाचे पदाधिकारी आणि संमेलनाध्यक्ष ना. धों. महानोर गेले नाहीत. ‘महामंडळाचे कोणीही पदाधिकारी गेले नसल्याने ते चौथे विश्व मराठी साहित्य संमेलन असणार नाही, अशी भूमिका महामंडळाने घेतली.
मूळात विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या घटनात्मक वैधतेबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना महामंडळाचे सर्व ‘वऱ्हाड’ टोरांटोला गेले असते असे गृहीत धरले तरी ते अधिकृत कसे ठरेल, असा सवालही या निमित्ताने उपस्थित होत आहे.

Story img Loader