मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर गेल्या तीन वर्षांत ८२८ लोकांचा अपघातात बळी गेला असल्याची माहिती सोमवारी विधानसभेत देण्यात आली. राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. 
खेडपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या जगबुडी नदीच्या पुलावरून खासगी बस कोसळून झालेल्या अपघातात मंगळवारी पहाटे ३७ प्रवासी मृत्युमुखी पडले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाची मागणी अद्याप प्रलंबित असल्याची चर्चा सुरू झाली. वास्तविक या राष्ट्रीय महामार्गावर मृत्युमुखी पडणाऱया प्रवाशांचे प्रमाण मोठे आहे. अपघात रोखण्यात सरकारी उपाययोजना तोकड्या पडत असल्याचे मृतांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
सन २०१० ते २०१२ या कालावधीत या महामार्गावर ८२८ प्रवासी प्राणाला मुकले असून, २४११ जण गंभीर जखमी झाले आहेत, अशी माहिती विधानसभेत देण्यात आली. चालकाची चूक हेच सर्वाधिक अपघातांचे कारण असल्याचेही या उत्तरात म्हटले आहे.

Story img Loader