मुंबई : पारबंदर प्रकल्पातील (शिवडी-नाव्हा शेवा सागरीसेतू) आणखी एक महत्त्वाचा टप्पा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पूर्ण केला. या प्रकल्पातील नवी मुंबईच्या दिशेने प्रकल्पाच्या जमिनीवरील मार्गाच्या कामाला वेग देण्यात आला असून नुकताच येथील शेवटचा ४९ वा स्पॅन यशस्वीपणे बसविण्यात आला. आतापर्यंत प्रकल्पातील ८४ टक्के बांधकाम पूर्ण झाले असून हा प्रकल्प डिसेंबर २०२३ पर्यंत वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे प्रयत्न आहेत.
मुंबई – नवी मुंबई अंतर केवळ २० ते २५ मिनिटांत पार करता यावे यासाठी २२ किमी लांबीचा मुंबई पारबंदर प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या कामास २०१८ मध्ये सुरुवात झाली. सुमारे १७,८०० कोटीं रुपये खर्चाच्या या प्रकल्पाचे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करून तो वाहतूक सेवेत दाखल करण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे. आतापर्यंत प्रकल्पाचे ८४ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम वेगात करण्यात येत आहे. या प्रकल्पातील २२ किमी लांबीच्या सागरीसेतूचा २.७ किमीचा भाग नवी मुंबईच्या दिशेने चिरले येथे जमिनीवर आहे. या भागाच्या सर्व खांबांचे काम पूर्ण झाले असून या खांबांवर बसविण्यात येणाऱ्या शेवटच्या ४९ व्या स्पॅनचे काम यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले.
हेही वाचा : ‘मेट्रो २ ब’ प्रकल्पातील मोठा अडथळा दूर ; चिता कॅम्पमधील ४०० झोपड्या हटविल्या
प्रकल्पाच्या टप्पा-२ मधील एमपी २४५- आणि एमपी २४६ (उजवी बाजू) या क्रमांकांच्या खांबामधील शेवटचा स्पॅन बसविण्यात आला. मुंबईतील शिवडी येथून सुरू झालेला सागरीमार्ग २.७ किमीच्या या जमिनीवरील मार्गावर येऊन संपणार आहे. या भागाचे काम आता पूर्ण होत आहे. स्पॅन बसविण्याचे काम पूर्ण झाल्याने आता त्यावर सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे.