कांद्याच्या दरात झालेली लक्षणीय वाढ लक्षात घेऊन मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक बाजारात इजिप्तहून सुमारे सहा हजार टन कांदा आयात केला जाणार आहे. त्यातील ८४ टन कांदा शनिवारी उरण येथील जवाहरलाल नेहरू बंदरात (जेएनपीटी) हा कांदा उतरवण्यात आला. तो काही दिवस सुकवण्याची प्रक्रिया केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
कांदा, लसूण आणि बटाटा घाऊक बाजाराचे माजी संचालक अशोक वाळुंज यांनी परदेशातून कांदा आणला जात असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. काही व्यापाऱ्यांनी बाहेरून कांदा मागवला आहे; मात्र त्यांनी आपली प्रसिद्धी करण्यास नकार दिला. आयात कांद्यामुळे देशातील भाववाढ आटोक्यात राहील. यासाठी काही कांदा आंध्र प्रदेशातून येण्याची आवश्यकता आहे.
उत्तर तसेच पश्चिम महाराष्ट्रातील कांद्याच्या उत्पन्नाला लहरी पावसाचा तडाखा बसला आहे. त्यामुळे कांद्याची आवक पूर्णपणे थांबली आहे. सध्या शेतात असलेल्या कांद्याला पावसाची आवश्यकता आहे; परंतु ऑगस्टमध्येही पावसाने ओढ दिल्याने अपेक्षित उत्पन्न हातात येईल, याची शाश्वती नाही, असे व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यातच काही व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या संगनमताने कांद्याची साठवणूक केल्याच्या तक्रारी आल्याने नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी कांदा चाळींची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे तोही कांदा बाजारात येण्याची शक्यता आहे.

Story img Loader