मुंबई व लगतच्या महानगर प्रदेशात पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या उभारणीसाठी कार्यरत असलेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा ४०२८ कोटी ५७ रुपयांचा २०१३-१४ चा अर्थसंकल्प शनिवारी मंजूर झाला. कुलाबा ते सीप्झ भुयारी मेट्रो रेल्वे, शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू, वरळी ते शिवडी उन्नत मार्ग, कलानगर-वांद्रे कुर्ला संकुलाजवळील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी भुयारी मार्ग-उड्डाणपूल प्रकल्प आदी मुंबईतील नवीन प्रकल्पांसाठी ८४७ कोटींची भरीव तरतूद करण्यात आली आहे.
तसेच मागच्या वर्षीप्रमाणे ठाणे, कल्याण, बदलापूर, वसई पट्टय़ातील रस्ते, उड्डाणपुलांच्या कामांवर या अर्थसंकल्पात भर ठेवण्यात आला असून त्यासाठी ६२२ कोटींची तरतूद आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची बैठक मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी पार पडली. या बैठकीत अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली. ‘एमएमआरडीए’चे महानगर आयुक्त यू. पी. एस. मदान, मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया, मुंबईचे महापौर सुनील प्रभू, आमदार नबाब मलिक, प्रकाश बिनसाळे, ‘सिडको’चे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया, महानगर प्रदेशातील महानगरपालिका, नगर परिषदांचे महापौर-वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
या अर्थसंकल्पात मुंबईतील नवीन प्रकल्पांसाठी ८४७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यात कुलाबा ते सीप्झ भुयारी मेट्रो रेल्वे (५०० कोटी रुपये), शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू (१५० कोटी), वरळी-शिवडी उन्नत मार्ग (५० कोटी), कलानगर जंक्शन भुयारी मार्ग (७५ कोटी), वांद्रे-कुर्ला संकुल ते पूर्व द्रुतगती महामार्गाला जोडणारा उन्नत मार्ग (५० कोटी), खेरवाडी उड्डाणपूल (२२ कोटी) या प्रकल्पांचा समावेश आहे.
त्याचबरोबर अर्थसंकल्पात विस्तारित मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पाला प्राधान्य देण्यात आले असून त्यासाठी ६२२ कोटी रुपयांची तरतूद आहे. त्यात वसई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, कर्जत भागातील ९० पेक्षा अधिक किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे जाळे विस्तारित करण्यासाठी सुरू असलेल्या कामांचा समावेश आहे. त्यात सहा उड्डाणपूल, नायगाव-भाईंदर दरम्यान वसई खाडी पूलाचे बांधकाम, अशा काम सुरू असलेल्या प्रकल्पांचा समावेश आहे. त्याचबरोबर मोनोरल प्रकल्पासाठी ६०० कोटी रुपये, मुंबई नागरी परिवहन प्रकल्पासाठी ५०० कोटी रुपये, आणिक-पांजरपोळ व पांजरपोळ-घाटकोपर जोड रस्ता (५५ कोटी), मिलन सबवे उड्डाणपूल-सहार उन्नत मार्ग (३५ कोटी), अंधेरी-कुर्ला जोड रस्ता (२७ कोटी), उड्डाणपुलांचे बांधकाम (३४ कोटी), वडाळा ट्रक टर्मिनस विकास (८५ कोटी), विरार ते अलिबाग बहुद्देशीय मार्गासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात आहे.
मुंबई नागरी परिवहन प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या ५०० कोटी रुपयांच्या तरतुदीपैकी ३०० कोटी रुपये रेल्वेच्या कामांसाठी ठेवण्यात आले आहेत. त्यात सीएसटी ते कुर्ला पाचवा आणि सहावा अतिरिक्त मार्ग, ठाणे-दिवा अतिरिक्त मार्ग, मुंबई सेंट्रल-बोरिवली दरम्यानचा सहावा मार्ग व उपनगरीय गाडय़ांसाठी नव्या डब्यांची खरेदी यांचा समावेश आहे.
संभाव्य प्रकल्पांच्या अभ्यासासाठी २० कोटी
शिरगाव-पडघा-टिटवाळा-बदलापूर रस्ता (३७ किमी), कल्याण रिंग रोड (२९.७० किमी), भिवंडी रिंग रोड (१२ किमी), नेरळ-दस्तुरी नाका-माथेरान रस्ता (८ किमी), माणकोली-डोंबिवली जोडरस्ता (३.२० किमी), रेवस-कारंजा पूल (१.८० किमी), खोपोली बाह्यवळण रस्ता (५.८० किमी) आदी प्रकल्पांचा अभ्यास करण्यासाठी ‘एमएमआरडीए’च्या अर्थसंकल्पात २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा