सार्वजनिक ठिकाणी कीटकनाशकांची फवारणी करून पालिकेने डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. मात्र मुंबईत सापडलेल्या डेंग्यूच्या ८५ टक्के रुग्णांच्या निवासस्थानी डासांच्या अळ्या आढळून आल्याची खळबळकजनक माहिती कीटकनाशक अधिकारी राजन नारिंग्रेकर यांनी दिली. मात्र डेंग्यूची साथ रोखण्यात अपयशी ठरलेल्या पालिका प्रशासनावर नगरसेवकांनी टीकास्र सोडले.
डेंग्यूच्या अळ्यांची उत्पत्ती स्वच्छ पाण्यामध्ये होत असून त्याला आळा घालण्यासाठी टॅमिफोस रसायनाचा वापर केला जातो. २ कोटी ८० लाख रुपये किमतीचे टॅमिफोस खरेदी करण्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत सादर केला होता. सध्या डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याबद्दल नगरसेवकांनी चिंता व्यक्त केली आणि डासांचा प्रादुर्भाव रोखण्यात अपयशी झालेल्या प्रशासनावर टीकेची झोड उठविली.
पावसाळा लांबल्यामुळे आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांवर डासांचा शोध घेण्याचे काम सोपविण्यात आले होते. सार्वजनिक ठिकाणी कीटकनाशकांची फवारणी केल्यामुळे डासांच्या उत्पत्तीवर नियंत्रण आले होते. काही ठिकाणी पोहोचणे शक्य नसल्याने तेथे डासांचा प्रादुर्भाव झाल्याची कबुली नारिंग्रेकर यांनी दिली. मात्र तरीही डेंग्युचे रुग्ण आढळून आल्यामुळे पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णांच्या घरी जाऊन पाहणी केली असता तेथे डेंग्युचे डास आढळून आले. घरातील फुलझाडांच्या कुंडय़ा, फ्लॉवरपॉट, फेंगशुई पॉट आदींमध्ये डासांची उत्पत्ती होत आहे, असे ते म्हणाले.