मुंबई : पावसाळ्याच्या चार महिन्यांत म्हणजे १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत मिळून होणाऱ्या पावसापैकी जवळपास ८६ टक्के पाऊस यंदा दोन महिन्यातच झाला आहे. दरम्यान, गुरुवारपासून पुढचे दोन ते तीन दिवस मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मागील संपूर्ण आठवडाभर राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली आणि आता पुढील तीन चार दिवस पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पावसाळी हंगाम हा १ जून ते ३० सप्टेंबर असा ग्राह्य धरण्यात येतो. या कालावधीत मुंबईत कुलाबा केंद्रात सरासरी २२१३.४ मिमि तर सांताक्रुझ केंद्रात सरासरी २५०२.३ मिमि पावसाची नोंद होते. यंदा मात्र कुलाबा केंद्रात एकूण सरासरीच्या ८६ टक्के तर सांताक्रुझ केंद्रात सरासरीच्या ८१ टक्के पावसाची नोंद अवघ्या दोन महिन्यांत झाली आहे. यंदा मुंबईत मोसमी पाऊस वेळेवर दाखल झाला. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली. जूनमध्ये अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यानंतर जुलैमध्ये मात्र एखाद दिवसाची विश्रांती घेत मुंबई शहर आणि उपनगरांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. जुलैमध्ये पावसाने जूनची तूट भरून काढलीच त्याबरोबर जून-जुलैमध्ये होणाऱ्या एकून पावसापेक्षा अतिरिक्त पावसाची नोंद केली. मुंबईत १ जून ते ३० जुलैपर्यंत कुलाबा येथे १८९३.७ मिमी तर सांताक्रूझ येथे २०३७.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये कुलाबा केंद्रात ६४७.७ मिमी तर, सांताक्रूझ केंद्रात ६७३.५ मिमी पाऊस अधिक झाला आहे.

हेही वाचा – आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताला चार पदके

गुरुवारी मुसळधार पाऊस

मुंबई शहर आणि उपनगरांत गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. मुंबईत सोमवारपासून ढगाळ वातावरण असले तरी काही दिवसांत फारसा पाऊस झालेला नाही. अधून मधून हलक्या सरी कोसळत होत्या. आता गुरुवारपासून पुढील दोन-तीन दिवस मुंबई शहर आणि परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हेही वाचा – बेकायदा फेरीवाल्यांना रोखण्यासाठी पालिकेचा नवा तोडगा, सध्या मुंबईतील २० जागा बेकायदा फेरीवालामुक्त करण्याचा दावा

गेल्या आठवड्यात किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला होता. यामुळे मुंबईसह राज्यातील इतर काही भागातही जोरदार पाऊस झाला. हा पट्टा विरला असल्याने सर्वत्र पाऊस ओसरला आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात मंगळवारी सकाळी ८ः३० ते सायंकाळी ५ः३० वाजेपर्यंत ९.२ मिमी तर सांताक्रूझ केंद्रात ७.६ मिमी पावसाची नोंद झाली. सध्या मध्य-भारतावरील पश्चिम-पूर्व कमी दाबाचा पट्टा (मान्सून ट्रफ) सक्रीय आहे. तसेच दक्षिण गुजरात ते केरळ दरम्यान किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा आहे. अरबी समुद्र आणि सौराष्ट्रच्या भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. त्यामुळे पुढील तीन – चार दिवसांत मुंबईसह राज्यातील इतर भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.