मुंबईः बालमजूरी विरोधात मुंबई पोलिसांच्या विशेष बालसहाय्य पोलीस कक्षाने (जापू) २०२४ पासून आतापर्यंत ४० गुन्हे दाखल केले असून या प्रकरणांमध्ये ८७ अल्पवयीन मुलांची सुटका करण्यात आली आहे. सुटका करण्यात आलेल्या मुलांमध्ये उत्तर प्रदेश व बिहारमधील मुलांची संख्या अधिक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यावर्षी आतापर्यंत बालमजुरीप्रकरणी १२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
उत्तर प्रदेश, बिहारमधून सर्वाधिक बालकामगार
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२४ मध्ये मुंबईतील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये बालकामगारप्रकरणी २८ गुन्हे दाखल करण्यात आले होते. या कारवाईत ६१ अल्पवयीन मुलांची सुटका करण्यात आली होती. त्याप्रमाणे २०२५ मध्ये आतापर्यंत १२ गुन्हे नोंदवण्यात आले असून, २६ मुलांना तस्करीतून वाचवण्यात आले आहे. गेल्या वर्षापासून आतापर्यंत ८७ मुलांची सुटका करण्यात आली आहे. त्यात उत्तर प्रदेश व बिहारमधील मुलांची संख्या अधिक आहे.
शिवडीतील कारखान्यावर छापा ,६ अल्पवयीन मुलांची सुटका
मुंबई गुन्हे शाखेच्या जापू कक्षाकडू मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रफी अहमद किडवाई (आरएके) मार्ग पोलिसांच्या हद्दीतील कारखान्यावर छापा टाकण्यात आला. त्यावेळी सहा अल्पवयीन मुले आढळली. राज्य शासनाचे अधिकारी व पोलिसांनी मिळून संयुक्तरित्या ही कारवाई केली. त्यावेळी मुलांकडून कामे करून घेतली जात असल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईत सुटका करण्यात आलेल्या ३ मुलांचे वय १७ वर्षे, २ मुलांचे वय १५ वर्षे आणि एका मुलाचे वय १६ वर्षे आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यापैकी ५ मुले बिहारमधील असून १ मुलगा उत्तर प्रदेशमधून आला आहे.
कारखान्याच्या मालकावर गुन्हा दाखल
पोलिसांनी या प्रकरणात कारखान्याचा मालक मोहम्मद जियाउल्लाह अल्लाउद्दीन अश्रफ (४०) याच्याविरोधात बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायदा, २०१५ कलम ७५ आणि ७९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मुलांचा मोठा प्रवास
सुटका करण्यात आलेल्या मुलांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट होती. त्यामुळे कुटुबाला मदत करण्यासाठी मुले हजारो किलोमीटर प्रवास करून मुंबईत काम करण्यासाठी आली होती.
बालकामगार कोणत्या व्यवसायात काम करत होते ?
लहान मुले मुख्यतः कापड निर्मिती, हॉटेल (रेस्टॉरंट), चामड्यापासून वस्तूंची निर्मिती, किराणा दुकान, बांगडी कारखाने, टी सेंटर, खाद्य पदार्थ विक्री, कॅटरिंग व्यवसायात काम करताना आढळली. मुलांकडून अशा प्रकारे कामे करून घेणाऱ्या मालकांविरोधात गुन्हा दाखल केला जातो. त्यानंतर स्थानिक पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास केला जातो, असे पोलिसांनी सांगितले.