मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेतील आरे ते बीकेसी असा पहिला टप्पा डिसेंबर २०२३ मध्ये पूर्ण करण्याचे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे (एमएमआरसी) लक्ष्य आहे. त्यामुळेच पहिल्या टप्प्याच्या कामाला एमएमआरसीने वेग दिला असून आतापर्यंत या टप्प्याचे ८८.२ टक्के काम पूर्ण झाल्याचे एमएमआरसीने जाहीर केले आहे. त्याचवेळी बीकेसी ते कफ परेड या दुसऱ्या टप्प्याचे कामही प्रगतीपथावर असून या टप्प्याचे ७७.३ टक्के काम पूर्ण झाले आहे.
एमएमआरसीच्या माध्यमातून मेट्रो ३ चे काम सुरु आहे. हा प्रकल्प आतापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र अनेक कारणांनी या मार्गिकेस विलंब होताना दिसत आहे. पण आता मात्र पहिला टप्पा डिसेंबर २०२३ मध्ये तर दुसरा टप्पा जून २०२४ मध्ये पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी आता एमएमआरसीने कामाला वेग दिला आहे. एमएमआरसीच्या ३१ मे २०२३ पर्यंतच्या कामाच्या आढावा अहवालानुसार आरे ते बीकेसी टप्प्याचे ८८.३ टक्के काम पूर्ण झाले आहे. तर बीकेसी ते कफ परेड टप्प्याचे ७७.३ टक्के काम पूर्ण झाले आहे. या अहवालानुसार आरे ते बीकेसी टप्प्यातील सर्व स्थानकांचे बांधकाम आणि सिग्नल यंत्रणा, विद्युत यंत्रणांसह सर्व प्रकारच्या प्रणालीचे-यंत्रणांचे (सिस्टीम) काम प्रगतीपथावर आहे.
आरे ते बीकेसी टप्प्यातील स्थानकांच्या कामाचा आढावा
स्थानक- बांधकाम (टक्क्यात)-सिस्टीमचे काम (टक्क्यात)
आरे-३२.५-१८
सीप्झ-९७.५-८५.८
एमआयडीसी-९८.२-८६.७
मरोळ-९४.७-७२
सहार रोड-९०.८-६७.१
विमानतळ टर्मिनल १-९३-६९.१
विमानतळ टर्मिनल २-९०.८-६७.१
सांताक्रूझ-८९.८-५९.२
विद्यानगरी-९२.८-६६.८
बीकेसी-९२.३-६०.७