पाऊस ओसरल्यावरही डेंग्यूचा प्रभाव कायम राहिला असून अंधेरी साकीनाका येथे एका गर्भवती महिलेचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याचा संशय आहे. शहरातील हा डेंग्यूचा आठवा मृत्यू आहे. ‘रॅपिड टेस्ट’मध्ये महिलेला डेंग्यू असल्याचे दिसत असले तरी पालिका ‘एलिसा’ या चाचणीला अधिकृत मानते.  
साकीनाका येथील रुबी शेख (२०) ही महिला नऊ महिन्यांची गर्भवती होती. गेल्या महिन्यात तिला मलेरिया झाला होता. ताप येत असल्याने तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. तेव्हा मलेरिया असल्याचे निष्पन्न झाले होते. तिची तब्येत बिघडत गेल्याने तिला जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढच्या २२ दिवसात तिचे मूत्रपिंड निकामी झाले तसेच प्रकृती बिघडत गेली. तिच्या मृत्यूपूर्वी थोडा वेळ आधीच तिच्या बाळाचाही मृत्यू झाला होता.
यावर्षी डेंग्यूचे सुमारे साडेसहाशे रुग्ण आढळले आहेत. महानगरपालिकेच्या अधिकृत आकडेवारीनुसार गेल्या आठवडाभरात डेंग्यूचे ४५ रुग्ण पालिकेच्या विविध रुग्णालयात उपचार घेत होते. या महिन्यात आतापर्यंत तापाचे ४०४२ रुग्ण, मलेरियाचे ४३७, डेंग्यूचे ८२, विषमज्वराचे ७६, गॅस्ट्रोचे २८५ आणि काविळीचे ६७रुग्ण पालिका रुग्णालयात उपचारांसाठी आले.