मुंबई : सुमारे १० कोटी रुपयांच्या सोन्याच्या तस्करीप्रकरणी सीमा शुल्क विभागाने नऊ परदेशी महिलांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली. आरोपी महिलांकडून १८ किलो सोने जप्त करण्यात आले. आरोपी महिलांविरोधात सीमा शुल्क कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात परदेशी महिलांना सोन्याच्या तस्करीप्रकरणी अटक झाल्याची आठवडय़ातील ही दुसरी घटना आहे.
केनिया एअरवेजच्या विमानाने मुंबई विमानतळावर आलेल्या नऊ महिलांना मंगळवारी सीमा शुल्क विभागाच्या हवाई गुप्तवार्ता कक्षाच्या (एआययू) अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. त्यांना तस्करी करून काही वस्तू आणल्याबाबत विचारले असता महिलांनी नकारार्थी उत्तर दिले. त्यामुळे त्यांच्याकडील सामानाची तपासणी करण्यासाठी त्यांना थांबवून एका खोलीत बसवण्यात आले. त्या वेळी आरोपी महिलांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यांना पुन्हा प्रवेशद्वाराजवळून एआययूच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. तपासणीत त्यांच्याकडे २४ कॅरेटच्या १३ हजार ६४० ग्रॅम सोने सापडले. २१ कॅरेटचे २३४० ग्रॅम व १८ कॅरेटचे ११३६ ग्रॅम सोने तसेच ११३६ ग्रॅम सोन्याचे दागिने सापडले. आरोपी महिलांकडून एकूण १८ किलो २८० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले असून त्याची किंमत नऊ कोटी ४२ लाख रुपये आहे.
या प्रकरणी सीमा शुल्क कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अर्दो नूर, शुक्री फराह, केरो जामा, हबीबा उमर, एब्ला अब्दुलाही, अनाब मुहुमेद, अनीसा मुबारक, इस्निना युसूफ, जैनाब मोहमुद या महिलांना सीमाशुल्क अटक करण्यात आली. त्या सर्व कापडविक्री संबंधित कामे करतात. त्या २६ ते ४७ वयोगटातील आहेत.
मुंबई विमानतळावर सोन्याच्या तस्करीप्रकरणी मोठय़ा प्रमाणात परदेशी महिलांना अटक होण्याची ही आठवडय़ातील दुसरी घटना आहे. त्यापूर्वी महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने सुदान देशाच्या नागरिक असलेल्या १८ महिलांना अटक केली होती. त्यांच्याकडून १० कोटी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले होते.