मुंबई : राज्यातील सर्व पथकर नाक्यांवर आता फास्टॅग अनिवार्य करण्यात आले असून या निर्णयाची मंगळवार, १ एप्रिलपासून अंमलबजावणी सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी मंगळवार महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) वांद्रे – वरळी सागरी सेतू, मुंबई – पुणे द्रुतगती महामार्ग आणि नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गातील नागपूर – इगतपुरी महामार्गावरून तब्बल ११ हजार ८०० वाहनांनी विनाफास्टॅग प्रवास केला आहे.

फास्टॅगविना प्रवास करणाऱ्या या वाहनांकडून एमएसआरडीसीने दुप्पट पथकर वसूल करून लोखोचा अतिरिक्त महसूल मिळवला. महत्त्वाचे म्हणजे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरून सर्वाधिक ६००० वाहनांनी विनाफास्टॅग प्रवास केला. महत्त्वाचे म्हणजे विनाफास्टॅग प्रवास करणाऱ्या वाहनांमध्ये सर्वाधिक हलक्या चारचाकी वाहनांचा समावेश आहे.

पथकर वसुलीत पारदर्शकता आणि सुसूत्रता आणण्यासाठी केंद्र सरकारने सहा-सात वर्षांपूर्वी फास्टॅग प्रणाली लागू केली. आता केंद्र सरकारच्या या निर्णयाची राज्यात कठोर अंमलबजावणी सुरू झाली आहे. सर्व पथकर नाक्यांवर १ एप्रिलपासून फास्टॅग बंधनकारक करण्यात आले असून फास्टॅग नसलेल्या वाहनांकडून दुप्पट पथकर वसूल करण्यास सुरुवात झाली आहे. फास्टॅग अनिवार्य करण्याचा निर्णय घेतल्यापासून सरकार, एमएसआरडीसीकडून १ एप्रिलच्या आत फास्टॅग स्टिकर लावून घेण्याचे आवाहन करण्यात येत होते. या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी दुसरीकडे पहिल्याच दिवशी फास्टॅगशिवाय प्रवास करणाऱ्याची संख्या लक्षणीय असल्याची बाब समोर आली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या दिवशी एमएसआरडीसीचे तीन महत्त्वाच्या रस्त्यांवरून तब्बल ११ हजार ८०० वाहनांनी विनाफास्टॅग प्रवास केला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून मंगळवारी ६००० वाहनांनी विनाफास्टॅग प्रवास केला असून यापैकी सर्वाअधिक वाहने चारचाकी असल्याचे सूत्रांनी सांगितले. या वाहनांकडून दुप्पट पथकर वसूल करण्यात आला आहे. दरम्यान, मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरून दररोज दीड लाख वाहने धावतात.

समृद्धीवर १३०० वाहनांकडून दुप्पट पथकर वसूल

समृद्धी महामार्गावरील नागपूर – इगतपुरी महामार्गावरून दिवसाला अंदाजे २५ हजार वाहने धावतात. या महामार्गावरून विनाफास्टॅग प्रवास करणाऱ्यांची संख्याही बऱ्यापैकी असल्याचे स्पष्ट झाले आहे. समृद्धी महामार्गावरून मंगळवारी विनाफास्टॅग प्रवास करणाऱ्या १३०० वाहनांकडून एमएसआरडीसीने दुप्पत पथकर वसूल केला.

मुंबईतही विनाफास्टॅग वाहने

मुंबईतही मोठ्या संख्येने वाहनांना फास्टॅग नसल्याचे समोर आले आहे. वांद्रे – वरळी सागरी सेतूवरून दररोज अंदाजे ७० हजार वाहने धावत असून त्यापैकी तब्बल ४५०० वाहनांनी मंगळवारी विनाफास्टॅग प्रवास केला. ही सर्व वाहने हलकी चारचाकी असून या वाहनांकडून दुप्पट पथकर वसूल करण्यात आला. दुप्पट पथकराच्या वसुलीतून अंदाजे नऊ लाख रुपयांची तिजोरीत भर पडली. मुंबईतील प्रवेशद्वारावरील पथकर नाक्यांवरील विनाफास्टॅग प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या उपलब्ध होऊ शकली नाही. मात्र तेथून विनाफास्टॅग प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे. दरम्यान, आता फास्टॅग अनिवार्य झाल्याने दुप्पट पथकराचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. त्यामुळे सर्व वाहनचालक-मालकांनी आपल्या वाहनांवर तात्काळ फास्टॅग स्टिकर लावून घ्यावे, असे आवाहन एमएसआरडीसीकडून करण्यात आले आहे.