मुंबई : नागपाडा येथील सिद्धार्थ नगरमध्ये बुधवारी रात्री आठच्या सुमारास पाण्याची टाकी फुटल्याने झालेल्या दुर्घटनेत एका नऊ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. तर, अन्य तीनजण जखमी झाले. जखमींमध्ये कामगार महिला, पुरुष व एका लहान मुलाचाही समावेश आहे. पाण्याचा दबाव वाढल्यामुळे टाकी फुटल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा >>> एटीएसकडून १७ बांगलादेशी घुसखोरांना अटक
महानगरपालिका प्रशासनातर्फे सिद्धार्थ नगरमध्ये पालिकेतील सफाई कामगारांसाठी आश्रय योजनेअंतर्गत घरे बांधण्यात येत आहेत. घरांच्या बांधकामाला लागणाऱ्या पाण्याचा साठा करण्यासाठी तेथे सिमेंटची टाकी बांधण्यात आली होती. पाण्याची टाकी रिकामी झाल्याने बुधवारी सकाळी त्यात पाणी सोडण्यात आले. त्यावेळी पाण्याचा दाब अधिक असल्याने सायंकाळी टाकी अचानक फुटली. टाकीच्या आसपास असलेले कामगार व त्यांची मुले कोसळलेल्या भिंतीखाली सापडले. या दुर्घटनेत खुशी खातून (९), गुलाम रसूल (३२), मिरज खातून (९), नजरानाबीबी (३३) आदी जखमी झाले. जखमींना उपचारासाठी तात्काळ नजीकच्या फौजिया रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच खुशीचा मृत्यू झाला. अन्य तीन जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
हेही वाचा >>> बेस्ट बस अपघात : अहवाल येण्यापूर्वीच महाव्यवस्थापकांची बदली, कंत्राटदारावरही कारवाई नाही
महापालिकेतर्फे घरांच्या बांधकामासाठी ज्या कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली होती, त्यानेच संबंधित जखमी कामगारांना कामावर ठेवले होते. या घटनेबाबत पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरु आहे.