मुंबई : सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्पातील दुसऱ्या टप्प्याचे काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळेच दुसरा टप्पा कार्यान्वित करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) मुदत गाठता येणार नसल्याचे चित्र आहे. प्रकल्पपूर्तीसाठी मुदतवाढ दिली जात आहे. दुसऱ्या टप्प्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. ते पूर्ण होण्यासाठी आणखी सहा महिन्यांचा कालावधी लागेल. त्यामुळे दुसरा टप्पा कार्यान्वित करण्यासाठी जून २०२५ चा मुहूर्त ठरला आहे.
‘एमएमआरडीए’ने सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्पातून पहिल्या टप्प्याअंतर्गत वसई-विरार महापालिकेसाठी पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. या प्रकल्पाअंतर्गत मीरा-भाईंदर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दुसऱ्या टप्प्याचे आतापर्यंत ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. वसई-विरार आणि मिरा-भाईंदरमधील पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लावून या शहरांना मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी सुमारे १,३२५.७८ कोटी रुपये खर्चाचा सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्प ‘एमएमआरडीए’ने हाती घेतला. या प्रकल्पाअंतर्गत ४०३ दशलक्ष लिटर क्षमतेने पाणीपुरवठा करण्यात येईल. प्रकल्पाच्या कामाला २०१७ मध्ये सुरुवात झाली. प्रारंभापासून ३४ महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र अनेक तांत्रिक अडचणी, भूसंपादन आणि इतर अडचणींमुळे काम संथगतीने सुरू होते.
ब
चार किलोमीटरपर्यंत कामे पूर्ण
२०२१ नंतर एमएमआरडीएने कामाला गती दिली. त्यामुळेच जून २०२३ मध्ये या प्रकल्पातील पहिला टप्पा पूर्ण झाला आणि त्यानंतर काही महिन्यांनी वसई-विरारला पहिल्या टप्प्यातून पाणीपुरवठा सुरू झाला. त्यानंतर दुसऱ्या टप्प्याच्या कामाला वेग देऊन आजवर तो कार्यान्वित होणे अपेक्षित होते. प्रकल्प कार्यान्वित होण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागणार असल्याची माहिती एमएमआरडीएतील सूत्रांनी दिली. चार किमीपर्यंतच्या जलवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम सुरू असून पाण्यांच्या टाक्यांचेही काम सुरू असल्याचेही सूत्रांनी सांगितले.