दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणी पुन्हा एकदा वाढत असून आता धरणे ९० टक्के भरली आहेत. धरणक्षेत्रात पावसाने ओढ दिल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून स्थिरावलेली पाणी पातळी आता किंचित वाढली आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी अशा सात धरणातील पाणीसाठा सध्या ९०.०१ टक्के आहे.
पावसामुळे पाणी साठ्यात भरघोस वाढ –
सातही धरणात मिळून सध्या १३ लाख २ हजार दशलक्ष लीटर पाणीसाठा आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून पडू लागलेल्या पावसामुळे पाणी साठ्यात भरघोस वाढ झाली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पाणी पातळी वाढत नव्हती. तरी दोन वर्षांच्या तुलनेत पाणीसाठा अधिक आहे. मात्र धरणाच्या पाणीसाठयात अजूनही १० टक्के तूट आहे.
मुंबईला दर दिवशी ३८०० दशलक्ष लीटर पाण्याचा पुरवठा –
मुंबईला दर दिवशी ३८०० दशलक्ष लीटर पाण्याचा पुरवठा केला जातो. या सातही धरणांची पाणी साठवण्याची क्षमता साडे चौदा लाख दशलक्ष लिटर इतकी आहे. पावसाळ्याचे चार महिने संपले की ऑक्टोबरमध्ये पाणीसाठ्याचा आढावा घेतला जातो. यावेळी धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली असतील तर पाणी कपातीची आवश्यकता नसते. पावसाचे अजून दोन महिने शिल्लक असून पाणी पातळीतील १० टक्के तूट भरून निघण्याइतका पाऊस पडणे आवश्यक आहे.
दरम्यान, शनिवारी दिवसभर ढगाळ हवामान राहील आणि काही ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. गेल्या चोवीस तासात पश्चिम उपनगरात सर्वाधिक २९.७२ मिमी पावसाची नोंद झाली. शहर भागात ७.१९ मिमी, पूर्व उपनगरात ८.५४ मिमी पाऊस पडला.
तीन वर्षांचा ६ ऑगस्टपर्यंतचा जलसाठा –
वर्ष – ( दशलक्ष लिटर मध्ये) – टक्केवारी
२०२२ – १३, ०२,७७५ – ९०.०१ टक्के
२०२१ – ११,५७,१६१ – ७९.९५ टक्के
२०२० – ६,००,१५६ – ४१.४७ टक्के