लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतलेल्या ठाणे खाडी पूल ३ प्रकल्पातील दक्षिणेकडील अर्थात पुण्याहून नवी मुंबई, मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गिकेचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम फेब्रुवारी २०२५ पर्यंत पूर्ण करून ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन आहे. त्यामुळे फेब्रुवारीपासून पुणे – नवी मुंबई, मुंबई प्रवास सुसाट होण्याची शक्यता आहे.

ठाणे खाडी पूल ओलांडून मुंबईहून पुण्याला आणि पुण्याहून मुंबईला येण्यासाठी दोन खाडी पूल सध्या सेवेत दाखल आहेत. ठाणे खाडी पूल १ आणि २ वरून धावणाऱ्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तुलनेत ठाणे खाडी पूल – २ वरील वाहनांची संख्या अधिक असून या पुलावरील भार वाढत आहे. या पुलाचा सेवा दर्जाही खालावला आहे. तसेच वाहनांना कोंडीत अडकावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर एमएसआरडीसीने ठाणे खाडी पूल ३ चे काम हाती घेतले आहे. १.८३७ किमी लांबीच्या आणि ठाणे खाडी पूल-२ ला समांतर तीन-तीन मार्गिका असलेल्या या खाडी पूल ३ च्या प्रत्यक्ष कामाला २०२० मध्ये सुरुवात झाली.

आणखी वाचा-झिका रुग्णांच्या उपचरासाठी ठाणे जिल्हा रुग्णालयात ३० बेडचा अद्यावत कक्ष !

याविषयी एमएसआरडीसीच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता दक्षिणेकडील मार्गिकेचे ९० टक्के काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी फेब्रुवारी २०२५ उजाडणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर तात्काळ ही मार्गिका सेवेत दाखल करण्यात येईल. असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे पुणे-नवी मुंबई, मुंबई प्रवास खाडी पूल ३ वरून करण्यासाठी वाहनचालक-प्रवाशांना फेब्रुवारीपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

तांत्रिक अडचणींमुळे विलंब

  • आतापर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र काम सुरू झाल्याबरोबर आलेले करोना काळ आणि तांत्रिक अडचणींमुळे कामाला विलंब झाला.
  • मागील एक-दीड वर्षांपासून एमएसआरडीसीने कामास वेग देऊन मुंबईहून पुण्याच्या दिशेच्या उत्तरेकडील मार्गिकेचे काम पूर्ण केले आणि ही मार्गिका ऑक्टोबरमध्ये वाहतूक सेवेत दाखल केली.
  • मुंबई – नवी मुंबई, पुणे प्रवास अतिवेगवान झाला आहे. ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल झाल्यानंतर दक्षिणेकडील, पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणारी मार्गिका केव्हा सुरू होणार याची प्रतीक्षा वाहनचालक-प्रवाशांना आहे.
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 90 percent work on second lane of thane creek bridge 3 completed mumbai print news mrj